लासलगाव: (Summer Onion) उन्हाळी कांद्याचे घटते दर आणि वाढती आवक यामुळे काढलेल्या कांदा थेट बाजारपेठेत घेऊन जाण्यावर शेतकऱ्यांचा भर राहिला आहे. कांदा हा नाशवंत आहे. यातच वाढत्या उन्हामुळे लवकर खराब होतो. यामुळे दर कमी असतानाही शेतकऱ्यांनी (Onion) कांदा विक्रीवर भर दिला आहे. पण आता शेतकऱ्यांना 5 दिवस कांदाच विकता येणार नाही. कारण मार्च एंडिंग, सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे (Lasalgaon Market) लासलगाव व पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितसह जिल्ह्यातील 17 बाजार समित्यांमधील लिलाव बंद राहणार आहेत. कांद्याबरोबरच धान्याचेही व्यवहार बंद असल्याने कोट्यावधींची उलाढाल ही ठप्प राहणार आहे. सध्या उन्हाळी कांद्यासह रब्बी हंगामातील हरभरा, सोयाबीन आणि तुरीची मोठ्या प्रमाणात आवक सुरु होती. पण आता सलग पाच दिवस शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
गेल्या महिनाभरापासून कांद्याच्या दरात घसरण होत आहे. यापूर्वी खरिपातील लाल कांद्याची आवक सुरु असताना कांद्याला मागणीही आणि दरही चांगला होता. मात्र, आता उन्हाळी कांद्याची आवक सुरु झाली आहे. 3 हजार रुपये क्विंटल असणारा कांदा थेट 1 हजार रुपयांवर येऊन ठेपला आहे. राज्यातील लासलगाव, सोलापूर, पिंपळगाव या मुख्य बाजार समित्यांमध्ये अशीच अवस्था आहे. चांगल्या प्रतीच्या कांद्याला 1 हजार तर सर्वसाधारण दर हा 800 रुपयांपर्यंत आहे. शिवाय आता सलग 5 दिवस लिलाव बंद राहूनही दरावर त्याचा फारसा परिणाम होणार नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. कारण मुळात मागणीतच घट आहे. त्यामुळे दर वाढतील असे नाही पण बाजार समितीमध्ये दाखल झालेल्या कांद्याचे नियोजन करण्यासाठी बाजार समिती प्रशासनाला वेळ मिळणार आहे.
मार्च महिना संपुष्टात येत असून कांद्याची आवक अद्यापही मोठ्या प्रमाणात येत आहे. तसेच नवीन उन्हाळ कांद्याची आवक दाखल झाली. कांद्याच्या बाजारभावात दररोज घसरण होत कांद्याचे बाजार भाव एक हजार रुपयांच्या आत आले असून सर्वसाधारण 800 ते 1000 रुपये प्रतिक्विंटल कांद्याला बाजार भाव मिळत आहे. कांदा उत्पादक शेतकरी आपला कांदा तोट्यात विक्री करत असताना आता दुष्काळात तेरावा महिना अशी परस्थिती निर्माण झाली आहे. मार्च एंडिंगच्या, सण आणि साप्ताहिक सुट्ट्या निमित्त बँकेतून पैसा मिळणार नसल्याने लासलगाव व पिंपळगाव बाजार समितीसह जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा व धान्यचे लिलावाचे कामकाज बंद राहणार आहेत.
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव या बाजार समित्या कांद्यासाठी प्रसिध्द आहेत. दिवसाकाठी 400 ते 500 वाहनांतून कांदा या बाजार समित्यांमध्ये दाखल होतो. जिल्ह्यातील 17 बाजार समित्यांमधील व्यवहार हे बंद राहणार आहेत. सध्या रब्बी हंगामातील हरभरा, सोयाबीन आणि तुरीची आवक होत असताना या बाजार समित्या बंद राहणार आहेत. त्यामुळे कोट्यावधींची उलाढालीवर परिणाम होणार आहे.
Nanded: नुकसान खरिपाचे भरपाई रब्बीत, पाडव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांसाठी गोड बातमी..!
Hapus Mango : फळांच्या राजाची जपानमध्येही दमदार ‘एंट्री’, केशरच्या मागणीतही वाढ