मुंबई : काळाच्या ओघात सर्व वस्तुंच्या किंमती वाढत असल्या तरी कांदा याला अपवाद राहिलेला आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यापासून (Onion Rate) कांदा दरातील घसरण ही सुरुच आहे. शिवाय नाफेडने कांदा खरेदी बंद केल्यापासून तर दरात पुन्हा घसरण सुरु झाली आहे. देशातील मुख्य बाजारपेठ असलेल्या (Lasalgoan Market) लासलगावच्या बाजार समितीमध्ये कांद्याला 11 रुपये किलो असा दर मिळत आहे. गेल्या एक महिन्यात कांद्याच्या किमतीमध्ये 19 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास 32 टक्क्यांनी कांद्याच्या किंमती घटल्या आहे. कांद्याला किमान 25 रुपये दर मिळावा अन्यथा 16 ऑगस्टपासून राज्यातील बाजार समित्यांमध्ये (Onion Arrival) कांद्याचा पुरवठाच होऊ दिला जाणार नाही असा इशारा कांदा उत्पादक संघटनेने दिला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरीच आता सर्वसामान्यांचा आणि सरकारचा वांदा करणार आहेत. घटत्या दरामुळे हा निर्णय घेण्याचा निर्धार संघटनेने केला आहे.
पोषक वातावरण आणि लागवड क्षेत्रात झालेली वाढ यामुळे उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली होती. उत्पादनात वाढ झाली मात्र, गेल्या सहा महिन्यापासून कांदा दरात वाढ झाली नाही. सध्या कांद्याला 1 हजार ते 1 हजार 500 रुपये क्विंटल असा दर आहे. शिवाय अधिकच्या दराच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली आहे. पुरवठा वाढल्यानं शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही. सरकारच्या आकडेवारीनुसार देशभरात 317 लाख टनांहून अधिक कांद्याचं उत्पादन झालंय. हे उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा 51 लाख टनांहून अधिक आहे.
कांदा निर्यातीमधून शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळतो. मात्र, निर्यातीबाबतच्या धोरणामध्ये अपेक्षित बदल केला जात नाही. शिवाय कांदा निर्यातदारांकरीता केंद्र शासनाने लागू केलेली 10 % कांदा निर्यात प्रोत्साहन योजना गेल्या दोन वर्षापासून बंद आहे. परदेशातही भारतीय कांद्याला फारशी मागणी नसल्यानं निर्यातही घटलीय. 2021-22 या आर्थिक वर्षात फक्त 15.37 लाख टन कांद्याची निर्यात झाली. शेतकरी संघटना कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्याची मागणी केली जात आहे. वाढत्या उत्पादनाबरोबरच चांगली बाजारपेठ आणि कांद्याला हमीभाव द्यावा अशी मागणी होत आहे.
किमान चार महिन्यानंतर का हाईना कांद्याचे दरात वाढ होणे गरजेचे होते. मात्र, दराच घट ही सुरुच आहे. त्यामुळे कांदा उत्पादक संघटनेने अनोखा निर्णय घेतला आहे. कांद्याला किमान 25 रुपये किलो असा दर मिळावी ही मागणी आहे. अन्यथा 16 ऑगस्टपासून कांद्याचा पुरवठाच बंद केला जाणार आहे. सध्याच्या दरामुळे कांदा उत्पादनावर होणारा खर्चही शेतकऱ्यांना परवडत नाही. शिवाय असेच दर राहिले तर उद्या खरिपातील कांदा मार्केटमध्ये आल्यावर यापेक्षाही दराची स्थिती बिकट होईल. त्यामुळे 16 ऑगस्टपर्यंत दर वाढले नाहीतर मात्र, बाजारपेठेतच कांदा आणू दिला जाणार नसल्याचे राज्य उत्पादक संघटनेचे भारत दिघोळे यांनी सांगितले आहे.