मुंबई : (Crop Change) पीक पध्दतीमध्ये बदल करुन शेतकरी उत्पादन वाढवण्यासाठी एक ना अनेक प्रयोग करीत आहे. केवळ बदलच नाहीतर काहीतरी वेगळे करुन ग्राहकांना भरुळ घालून उत्पन्न वाढवण्याचा फंडा आता राज्यात वाढत आहे. सध्या उन्हाच्या झळा वाढत आहेत त्याचप्रमाणे (Watermelon Arrival) कलिंगडची आवकही वाढत आहे. पण यंदाच्या हंगामात चर्चा आहे तरी (Yellow Watermelon) पिवळ्या कलिंगडाची. असाच प्रयोग बारामती तालुक्यातील मळद गावच्या प्रल्हाद गुलाबराव वरे यांनी केला आहे. गेल्या चार वर्षापासून त्यांनी पिवळ्या कलिंगडचे उत्पादन घेतले आहे. यावेळी त्यांनी या वेगळ्या आणि चवीला गोड असणारे कलिंगड थेट जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना राज्याच्या राजधानीत नेऊन दिले आहे. शिवाय जयंत पाटलांनी या अभिनव उपक्रमाचे तर कौतुक केलेच पण जे जे नवं ते बारामतीकरांना हव असं म्हणत याबाबतीत बारामतीकरांचा हातखंडा चांगला असल्याचे म्हणत शेतकऱ्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
यंदाच्या हंगामात बाजारपेठेत पिवळे कलिंगडही दिसू लागले आहेत. शेतकऱ्यांनी उत्पादनात बदल करुन शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, हिरव्या कलिंगडप्रमाणेच हे पिवळे कलिंगड चवीला गोड आहे. याचे मूळ उत्पादन हे तैवान येथे घेतले जाते. असे असले तरी बारामती तालुक्यातील प्रल्हाद वरे हे गेल्या चार वर्षापासून अशा पिवळ्या कलिंगडचे उत्पादन घेत आहेत. जास्त गर, चवीला गोड आणि दिसायला वेगळेच असल्याने याला बाजारभावही अधिकाच मिळत आहे. उत्पादनाबरोबर उत्पन्न वाढवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असून यंदा तर पोषक वातावरणामुळे तो साध्य होताना पाहवयास मिळत आहे.
प्रल्हाद वरे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची मुंबई येथे भेट घेऊन पिवळे कलिंगड त्यांना दिले. शेतकऱ्याच्या या अभिनव प्रयोगाचे त्यांनी कौतुक तर केलेच पण शेतीमध्ये जगापेक्षा वेगळं करण्याचा बारामतीकरांकडे चांगलाच हातखंडा असल्याचे सांगितले. राज्यातील शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक पिकांवरच भर न देता आधुनिकतेची कास धरणे गरजेचे आहे. वाढीव उत्पादनाबरोबरच बाजारपेठेचा अभ्यास घेऊन शेतकऱ्यांनी उत्पादन घेणे गरजेचे झाले असल्याचे सांगितले. पण या पिवळ्या कलिंगडाची चव काही औरच आहे म्हणत उत्पादन प्रक्रियेबाबात विचारपूसही केली. त्यांनी वरे यांचे कौतुकही केले.
प्रल्हाद वरे हे गेल्या चार वर्षापासून अशा पिवळ्या कलिंगडचे उत्पादन घेत असले तरी त्यांचा हा प्रयोग यंदा सर्वासमोर आला आहे. जास्त गर आणि चवीला गोड असणाऱ्या या कलिंगडालच्या वाढीसाठीही अडीच महिन्याचाच कालावधी लागतो. शिवाय उत्पादन प्रक्रिया ही हिरव्या कलिंगडाप्रमाणेच आहे. वरे हे गेल्या 30 वर्षापासून शेतीक्षेत्रात कार्यरत आहेत. शिवाय पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादनवाढीसाठी त्यांना बारामती कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन लाभत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बारामतीच्या मळद गावातील शेतकरी प्रल्हाद गुलाबराव वरे यांनी आज मुंबई येथे भेट घेतली व हे पिवळे कलिंगड भेट दिले. या पिवळ्या कलिंगडाकडे पाहिलं तर आपल्याला खात्री पटेल की जगापेक्षा वेगळं करण्याचा बारामतीकरांकडे चांगलाच हातखंडा आहे. pic.twitter.com/lvq17q66U0
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 6, 2022