बीड : राज्यात एकडीकडे मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळतोय. मुंबई, कोकण, पुणे, कोल्हापूर, सांगली, गडचिरोली, नांदेड भागात पूरस्थिती निर्माण झालीय. या भागातील धरणं भरुन ओसंडून वाहत आहेत. तर दुसरीकडे बीड जिल्हा (Beed District) आणि परिसरात अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. चांगला पाऊस येईल या आशेवर शेतकऱ्यांनी कमी पावसात पेरणी केली खरी. पण आता गोगलगायींच्या प्रादुर्भावानं (Snail Attack on Crop) इथला शेतकरी संकटात सापडलाय. बीड जिल्ह्यात तब्बल 200 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर गोगलगायींनी थैमान घातलंय. त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी हैराण झालाय.
जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, परळी आणि केज या तालुक्यात गोगलगायींनी शेतकऱ्यांच्या आताच उगवलेल्या पिकांची नासाडी सुरु केलीय. त्यामुळे शेतकऱ्याला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. सुरुवातीला झालेल्या पावसात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र आता गोगलगायींनी पिकांवर अतिक्रमण केलं आहे. बीड तालुक्यातील जीवन चव्हाण यांनी सोयाबीनची दुबार पेरणी केली त्यावर हजारोंचा खर्च देखील केला. मात्र आता पीक बहरत असतानाच पिकांवर गोगलगायीने हल्ला चढवल्याने जवळपास 60 टक्के पीक पूर्णपणे उध्वस्त झालंय.
अशी परिस्थिती केवळ जीवन चव्हाण या एकट्याच शेतकऱ्याची नाही. परिसरातील इतर शेतकऱ्याचं देखील अशाप्रकारे मोठं नुकसान होत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कृषी विभागाच्या क्रॉपसेफ योजनेतून शेतकऱ्याला हेक्टरी साडेसातशे रुपये अनुदान आहे. मात्र साडे सातशे रुपये म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्याची थट्टाच आहे. गोगलगायींमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना किमान हेक्टरी 20 हजार रुपयांचे अनुदान द्यावं अशी मागणी दत्ता जाधव या शेतकऱ्याने केलीय.
गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील तब्बल 200 हेक्टरहून अधिक खरीप पिकांचं मोठं नुकसान झालंय. मात्र यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे त्यांनी क्रॉपसेफ योजनेतून लाभ घेऊन यावर नियंत्रण मिळवावं, असं आवाहन कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी केलंय.
कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, निसर्गाच्या अशा फेऱ्यात बीड जिल्ह्यातील शेतकरी पुरता पिचला आहे. राज्यात सर्वदूर पाऊस जोरदार बरसत असताना बीडमध्ये मात्र पावसाने हुलकावणी दिलीय. काही भागात झालेल्या पावसामुळं पिकांना जीवदान मिळालं असलं तरी गोगलगायींमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे.