तेजस मोहतुरे, भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्यात 242 धान खरेदी केंद्र मंजूर केले आहेत. मात्र, त्यातील बरीचशी केंद्र सुरू झालेली नाहीत. त्यामुळं शेतकऱ्यांना धान नाईलाजाने व्यापाऱ्यांना विकावे लागत आहे. शासनाकडून (maharashtra government) प्रति क्विंटल 2040 रुपये दर दिला जातो. मात्र, येथील व्यापारी शेतकऱ्यांचे धान विकत घेताना केवळ 1600 ते 1700 रुपये देवून बळीराजाची एक प्रकारे थट्टा करीत असल्याचे धक्कादायक चित्र सध्या भंडाऱ्यातील तुमसर बाजार समितीत (Tumsar Market Committee) बघायला मिळत आहे.
भंडारा जिल्ह्यात सुमारे दीड लाखांहून अधिक शेतकरी धानाचं उत्पादन घेतात. आता खरीप हंगामाची लगबग सुरू झालेली आहे. शासनानं जिल्ह्यात 242 धान खरेदी केंद्र मंजूर केले असले तरी, त्यातील काही धान केंद्राचा अपवाद वगळता अनेक धान केंद्र हे कागदोपत्री सुरू दाखवून अद्यापही अनेक केंद्रांवर धान खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळं शेतकऱ्यांची आता आर्थिक कुचंबना होत आहे.
शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी सुरुवातीला शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागते. जिल्ह्यात शासकीय दप्तरी 242 धान खरेदी केंद्र सुरू झाले असले, तरी अद्यापही अनेक केंद्रांवर शेतकऱ्यांच्या नोंदणी सुद्धा झालेल्या नाही. असे असले तरी, शेतीच्या हंगामासाठी शेतकऱ्यांनी आता धान विक्रीसाठी काढले आहे. घरात धानसाठा ठेवण्यासाठी जागा नसल्याने शेतकऱ्यांनी त्यांचा धान तुमसरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आणून ठेवला आहे. धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यानं शेतकऱ्यांच्या असहायतेचा गैरफायदा व्यापारी उचलत असल्याचे चित्र तुमसरात बघायला मिळत आहे.
खरीप हंगाम सध्याजवळ येत असून, अवघ्या पंधरा दिवसांवर मृग नक्षत्र येऊन ठेपले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून जमीन तयार करत आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शिवारात शेतकरी शेतात बैलाद्वारे पाळी घालत आहे. काही जिल्ह्यात पावसापुर्वी लोकांनी भाताची पेरणी सुध्दा केली आहे.