भंडारा : भंडारा (bhandara) जिल्ह्यातील मोहाडी (Mohadi) तालुक्यात मागील महिन्याभरापासून वाघाचा (tiger) मुक्त संचार पहायला मिळत आहे. त्यामध्ये ताडगाव आणि धोप गावं जणू वाघाचे घर ठरले आहे. दिवस असो की रात्र वाघ शेतात अथवा रस्त्यावर दिसून येत आहेत. यामुळे शेतीचे कामं पुर्णपणे ठप्प झाले आहे. मजूर किंवा शेतकरी शेताकडं जायला घाबरत आहेत. त्यामुळे परिसरातील तब्बल 1500 हेक्टर जमीन तशीचं पडून आहे. त्यामुळे 5 हजार शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन हिरावले गेले आहे. बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांच्या हौसेसाठी आमचा जीव टांगणीवर का ? असा संतप्त सवाल येथील शेतकरी करीत आहे.
भंडारा जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यात वाघ पहाण्यासाठी पर्यटक पैसे खर्च करून येतात. पर्यटक आले पाहिजे म्हणून सरकार ही नागझिरा वर करोड़ो रुपये खर्च करत आहे. मात्र पर्यटकांना नागझिरात वाघ क्वचित बघायला मिळतात. मोहाडीत फुकट वाघ दिसत असल्याने मोहाडीलाच अभयारण्य घोषित करा असे येथील नागरिक आणि शेतकरी असे शेतकरी म्हणू लागले आहेत अशी माहिती तुलसी मोहतुरे यांनी दिली.
तर दूसरीकड़े वाघाच्या दहशतीने मजूर शेतात यायला तयार नाहीत. जिल्ह्यात उन्हाळी धान लागवड सुरु असून वाघाच्या दहशतीने मजूर यायला तयार नाही. दूसरीकड़े रात्री कृषी पंपाला वीज मिळत असल्याने शेतात जायला कुणी सुध्दा तयार नाही. यंदा तब्बल 1500 हेक्टर अशी पडून असल्याचं शेतकरी कैलाश निमकर यांनी सांगितलं.
हे सगळं असं असताना वनविभाग गस्तीवर शेतशिवरात फिरताना दिसत आहे. वनकर्मचारी सुद्धा वाघाच्या हल्ल्यात जखमी होताना दिसत आहे. मात्र शेतशिवारात वाघाचा मुक्त संचार रोखण्यास वनविभाग सुध्दा असमर्थ ठरत आहे. वाघाला आवडणारे प्राणी शेतात असल्यामुळे वाघ आपला ठिय्या वाढवला आहे असं विनोद मेश्राम क्षेत्र सहाय्यक मोहाडी यांनी सांगितलं.