सांगली : लॉकडाऊन आणि नैसर्गिक आपत्तीमुळे सांगली जिल्ह्यातील मिरजेत एका फळाबागायत शेतकऱ्याचं 25 लाख रुपयांचं नुकसान झालं. त्यामुळे या शेतकऱ्यांवर तब्बल 10 एकर पेरूच्या बागेवर कुऱ्हाडीचा घाव घालण्याची वेळ आलीय. महेंद्रसिंह बाळासाहेब शिंदे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. एकाचवेळी आसमानी आणि सुलतानी संकटांनी घेरल्यानं हा शेतकरी कर्जबाजारी झाला. हाताशी मुबलक शेती असतानाही निसर्गाचा लहरीपणा आणि कोरोनामुळे लागू असलेले निर्बंध या परिस्थिती शेती अडकली. यातूनच लावलेल्या बागेतून उत्पन्न कमी आणि कर्जच वाढत असल्यानं त्यांनी अखेर बाग तोडण्याचा निर्णय घेतला.
VIDEO: लॉकडाऊन आणि नैसर्गिक संकटांचा फटका, सांगलीतील मिरजेत फळाबागायत शेतकऱ्याचं 25 लाखाचं नुकसान, तब्बल 10 एकर पेरूच्या बागेवर कुऱ्हाडीचा घाव@dadajibhuse @OfficeofUT @AjitPawarSpeaks @Jayant_R_Patil
#Farmer #Farming #Sangli #Miraj pic.twitter.com/NOoixIv9li— Pravin Sindhu | प्रविण सिंधू ??✊ (@PravinSindhu) July 18, 2021
महेंद्रसिंह शिंदे यांनी 2 वर्षांपूर्वी मिरज बेडग रोडजवळ असलेल्या 10 एकर शेतात लखनौ सरदार या जातीच्या पेरूची बाग लागवड केली होती. त्यावेळी साडे सात हजार पेरूची रोपं लागवड करण्यासाठी 25 लाख रुपये खर्च आला होता. या पेरूच्या बागेपासून वार्षिक 15 लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी आशा होती. बागेत पेरूचे उत्पन्न सुरू झाले आणि कोरोनामुळे लॉकडाऊन लागला.
लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांनी शेतातील पेरू विकतच घेतले नाही. त्यामुळे पेरू झाडावरच सडले. यावर्षी तर बागेचा खर्च तरी निघेल असं वाटत होतं. पण अवकाळी आणि वादळी पावसाने आलेली फळे गळून गेली आणि मोठं नुकसान झालं. इतकी संकटं आल्यानंतर शासनाने पंचनामे केले, पण मदत काही दिली नाही, अशी तक्रार या शेतकऱ्याने केलीय. मदत न मिळाल्यानं अखेर सतत होणारं नुकसान टाळण्यासाठी संतप्त झालेल्या बागायतदार महेंद्रसिंह शिंदे यांनी 10 एकर बागेवर कुऱ्हाडीचा घाव घातला. आज पेरूच्या फळासोबत 10 एकर बाग त्यांनी तोडून काढली आहे.
शासन बागायतदार शेतकऱ्यांना मदत करतो, असे आश्वासन देते. प्रत्यक्षात मात्र, कोणतीही मदत मिळाली नाही. भारत कृषी प्रधान देश म्हटला जातो, पण कृषी व्यवसायाला मदत होत नाही. लॉकडाऊन व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेवटी या झाडावर कुऱ्हाडीचे घाव घालण्याची वेळ शेतकऱ्यांच्यावर आली आहे. आता तरी शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी महेंद्रसिंह शिंदे यांनी केली आहे.