यवतमाळ : यवतमाळ तालुक्यातील बोडबोडन गावात 2002 पासून सुरू झालेले शेतकरी आत्महत्येचे सत्र अजूनही थांबलेले नाही. आतापर्यंत गावात तब्बल 30 शेतकर्यांनी जीवनयात्रा संपविली आहे. गावात आमदार, खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्र्यांनी आतापर्यंत अनेक भेटी देत आश्वासनं दिली. मात्र, शेतकर्यांचे जीवनमान उंचावण्यातील अपयशानं शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच आहे.
बोडबोडन येथे 26 जानेवारी 2002 रोजी विनोद राठोड या शेतकर्याने कर्जामुळे आत्महत्या केली. तिथून गावातील शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरू झाले. आता विलास राठोड या शेतकऱ्याने कर्जापायी आत्महत्या केली. त्या निमित्ताने पुन्हा एकदा गावातील शेतकरी आत्महत्येचा विषय चर्चेत आला. आतापर्यंत या गावात 30 शेतकर्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवनयात्रा संपविली. वाढत्या शेतकरी आत्महत्यांमुळे गावकरी 26 हा आकडा कर्दनकाळ मानत आहेत.
विलास राठोड याने नुकतीच आत्महत्या केली. त्याच्याकडे 5 एकर शेती होती. यंदा पेरणीसाठी पैसा नसल्याने त्याची शेती पडीत राहिली. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, या विवंचनेत त्यानं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. मृत शेतकर्याच्या आई-वडिलांचे काही वर्षापूर्वी निधन झाले. आता कुटुंबात केवळ पत्नी आणि दोन लहान मुले आहे. या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत देऊन जगण्यासाठी आधार देण्याची मागणी केली जात आहे.
बोथबोदन गावामध्ये आजवर अनेक नेते आले, जगभरातील एनजीओ आले, अध्यात्मिक गुरू आले. मात्र, गावातील शेतकऱ्यांची अवस्था आहे तशीच आहे. गावातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी आजवर भेटीगाठी दौऱ्या पलीकडे कोणताच उपक्रम सरकारने राबविला नाही. विशेष मदत सुद्धा गावाला मिळाली नाही. सरकारं बदलली, बदलत्या सरकारमधील नेते गावभेटी देत फक्त सांत्वन करत राहिले, बाकी काहीच झालं नाही. त्यामुळे आतातरी मायबाप सरकारने या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.