धुळे : काळा तांदूळ हा शरीरासाठी फायदेशीर आहे तसेच त्यातील पोषण तत्व फायदेशीर ठरतात. त्याच अनुषंगाने लुपिन फौंडेशनच्या मार्गदर्शनाखाली साक्री तालुक्यातील रोहोड, कुडाशी, उमरपाटा या परिसरातील शेतकऱ्यांनी आता भाताची शेती करण्यास सुरुवात केली आहे. (Brown Rice Farming In Sakri Dhule)
भात हा भारतीय आहारातील एक महत्वाचा घटक आहे. परंतु भाताच्या अति सेवनामुळे अनेक आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. विशेषतः मधुमेह आणि हृदयरोगाच्या संबंधित व्यक्तींना तर बऱ्याचदा डॉक्टर भात वर्ज करण्यास सांगतात. परंतु जर तुम्ही तुमच्या आहारात काळ्या तांदळाचा भात समाविष्ट केलात तर त्यामुळे तुम्हाला अनेक व्याधींना दूर ठेवण्यासाठी फायदा होऊ शकतो.
विविध प्रथिने आणि पोषणतत्वे असलेला, ग्लूटेनचे नगण्य प्रमाण असलेला मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त, जीवस्त्व ई, लोह, कॅल्शिअम, मॅग्नेशिअमचे प्रमाण जास्त असलेला काळा भात यावर्षी पहिल्यांदाच साक्री तालुक्यातील रोहोड, कुडाशी व उमरपाटा या परिसरातील पाच गावातील वीस शेतकऱ्यांनी पिकविला आहे. लुपिन फाउंडेशनच्यावतीने शेतकऱ्यांना अर्धा एकर क्षेत्रावर लागवडीसाठी मोफत बियाणे देण्यात आले. तसंच शेतकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य आणि मार्गदर्शन केले गेले.
या भाताच्या नियमित सेवनाने कर्करोग व हृदयरोग टाळता येऊ शकतो आणि शरीरातील चरबीचे प्रमाण देखील कमी करता येऊ शकतं, असाही दावा करण्यात आला आहे. हा बहुउपयोगी काळा भात पिकण्याचे प्रमाण मात्र कमी असले, तरी या पिकाचे एकरी 13 ते 15 क्विंटल उत्पन्न येते, जे नियमित भात पिकापेक्षा कमी आहे, परंतु या भाताला भाव मात्र नियमित मागणी असलेल्या भातापेक्षा 4 ते 5 पट मिळतो.
बहुउपयोगी काळ्याचे उत्पन्न पश्चिम पट्ट्यातील आदिवासी शेतकरी घेऊ लागले आहेत. कृषी क्षेत्रातील हा नाविन्यपूर्ण बदल येत्या काही दिवसांत नक्कीच परिवर्तनाचा भाग बनेल, असा विश्वास लुपिन फाऊंडेशनचे जिल्हा प्रकल्प समन्वयक योगेश राऊत आणि निलेश पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी संस्थेचे राजेंद्र पगारे आणि मनोज एखान्दे हे प्रयत्नशील आहेत.
(Brown Rice Farming In Sakri Dhule)
संबंधित बातम्या
26 वर्षीय इंजिनीअरचा भन्नाट प्रयोग, मुंबईतील नोकरी सोडून दापोलीत काळा तांदूळ पिकवला