गणेश सोळंकी, बुलढाणा : बुलढाणा (buldhana) जिल्ह्यात शेतकऱ्यांना (farmer) जादा दराने बियाणे विक्री करणे एका कृषी केंद्र (Agricultural seeds centre)चालकाला चांगलेच भोवले आहे. खामगाव शहरातील अंकुर कृषी केंद्रावर 3600 रुपये छापील किंमत असलेल्या सोयाबीनच्या बियाणाची तब्बल 4200 रुपये दराने विक्री केली जात होती. हा संपूर्ण प्रकार शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांनी त्या केंद्रात जाऊन चांगलाच गोंधळ घातला होता. त्यानंतर दोन दिवस कृषी केंद्रावर आणि गोडाऊनवर कारवाई सुरू होती. या कारवाईनंतर कृषी अधिक्षकांनी या कृषी केंद्राचा परवाना निलंबित केला आहे. शिवाय कृषी केंद्र आणि तीन गोडाऊन मधील तब्बल दीड कोटी रुपये किमतीचे बियाणं असलेले गोडाऊन सील केले आहे. कृषी विभागाच्या या कारवाईमुळे बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.
खरीप हंगाम जसा-जसा जवळ येत आहे. तसा-तसा बळीराजा शेतीच्या मशागतीच्या कामांमध्ये चांगलाचं रमून गेलाय. मृग नक्षत्र अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे शेतकरी शेतीची मशागत करून जमीन तयार करत आहेत.
मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांसोबतच जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचे देखील मोठे नुकसान झालं होतं. त्यामुळे चारा टंचाई निर्माण झाली असल्यामुळे शेतकरी आता भुईमूग पिकाच्या चारा अधिक घेत आहे. परंतु भुईमूग पिकाचा चारा देखील महागला आहे. एका ट्रॉलीसाठी आठ ते दहा हजार रुपये मोजावे लागत आहे. मान्सूनपूर्वी होत असलेल्या मशागतीच्या कामांसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. त्यातच जनावरांना लागणारा चारा देखील महागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभं राहिलं आहे. तर दुसरीकडे शेती पिकांना भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना केलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकऱ्यांनी जनावरांसाठी चारा कसा खरेदी करावा असा काहीसा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे.