मुंबई : ज्वारी हे रब्बी हंगामातील एक मुख्य पीक आहे. विशेषत: मराठावाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील (Sorghum crop) ज्वारीचा दर्जा हा चांगला असल्याने सबंध राज्यातून येथील ज्वारीला मागणी असते. यंदा मात्र, या मुख्य पिकालाच शेतकऱ्यांनी बाजूला सारलेले आहे. बदलत्या परस्थितीप्रमाणे शेतकऱ्यांनी (Crop Change) पीक पध्दतीमध्येही बदल केला आहे. कारण ज्वारी हे कमी पाण्यावर आणि हलक्या प्रतिच्या जमिन क्षेत्रावर येणारे पीक आहे. मात्र, यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. त्यामुळे (Pulses) कडधान्याच्या माध्यमातून उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी ज्वारीला बाजूला करुन कडधान्यावर भर दिला आहे. त्यामुळे राज्यात 6 लाख हेक्टराने ज्वारीचे क्षेत्र घटले आहे. म्हणजेच 32 टक्क्यांनी पेरणी घटली आहे. ही परस्थिती यंदाचीच नसून गेल्या वर्षीही सरासरीच्या 3 लाख हेक्टराने क्षेत्रात घट झाली होती. केवळ पारंपरिक म्हणून पिकाचे उत्पादन न घेता आता शेतकरी कमर्शियल झाले आहेत.
एकतर ज्वारी हे कमी पाण्यावर घेतले जाणारे पीक आहे. रब्बी हंगामात एक किंवा दोन पाणी मिळाले तरी ज्वारीचे पीक पदरात पडते. मात्र, गेल्या दोन वर्षापासून सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस होत आहे. त्यामुळे ज्वारीच्या तुलनेत पाणी जास्त आणि उत्पादनही जास्त अशाच पिकांची शेतकऱ्यांनी निवड केलेली आहे. यामध्ये कडधान्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. शिवाय ज्वारी काढणे हे कष्टाचे काम आहे. यासाठी मजूरही मिळत नाहीत. शेतकऱ्यांना घरच्या सदस्यांनाच घेऊन काढणी करावी लागते तर सर्वात महत्वाचे म्हणजे ज्वारीच्या दरात वाढच होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. या सर्व बाबींमुळे यंदा ज्वारीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे.
राज्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र हे 51 लाख 19 हजार 898 हेक्टर एवढे आहे. असे असताना यंदा 57 लाख 31 हजार 189 हेक्टरावर रब्बी पिकांचा पेरा झाला आहे. पण ज्वारीचे क्षेत्र घटले आहे. म्हणजेच शेतकऱ्यांनी इतर पिकांना पसंती दिलेली आहे. गतवर्षी ज्वारी हे पीक 16 लाख 34 हजार हेक्टरावर होते तर यंदा 13 लाख 90 हजार 753 हेक्टरावर पेरा झाला आहे. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत 3 लाख हेक्टराने क्षेत्र घटले आहे.
काळाच्या ओघात शेतकरीही कमर्शियल होत आहे. ज्वारीतून अधिकचे उत्पन्न नाही तर अधिकचे कष्टच आहेत हे लक्षात आल्यानंतर शेतकरी कडधान्य पिकांकडे लक्ष केंद्रीत करीत आहे. त्यामुळे रब्बी हंगमातही सोयाबीन, करडई, राजमा, हरभरा या कडधान्यांचा पेरा अधिक झाला आहे. कडधान्य ही खरीप हंगामात घेतली जातात पण यंदाचे पोषक वातावरण आणि खरिपात पावसामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी हा बदल केला आहे.
Kharif Season: सोयाबीन, कापसाप्रमाणेच तुरीचीही अवस्था, योग्य दरासाठी ‘एका’ निर्णयाची आवश्यकता..!
नोंदणीपूर्ण होण्यापूर्वीच संपली मुदत, भातखरेदी केंद्रावर सुविधांपेक्षा अडचणी अधिक..!