नगर : राज्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण हे (Kharif Season) खरीप हंगामावरच अवलंबून आहे. शिवाय गेल्या तीन ते चार वर्षापासून सरासरीपेक्षा अधिकचा (Rain) पाऊस होत असल्याने उत्पादनात वाढ होत आहे. आता उत्पदनाबरोबर आता खरिपाच्या क्षेत्रात देखील वाढ होणार आहे. यंदा तब्बल 2 लाख हेक्टराने खरिपाचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज (Agricultural Department) कृषी विभागाने व्यक्त केला आहे. केवळ पेरणी क्षेत्र वाढले असे नाही तर ज्यामधून अधिकचे उत्पन्न पदरी पडणार अशाच पिकांवर भर दिला जाणार आहे. नगर जिल्ह्याचा समावेश हा पश्चिम महाराष्ट्रात होत असला तरी मराठवाड्याप्रमाणे पीक पध्दती ठरत आहे. त्यामुळेच यंदा शेतकऱ्यांचा कल हा कडधान्यावर राहणार आहे. 4 लाख 46 हजार हेक्टर सरासरी क्षेत्र असले तरी यंदा 6 लाख 68 हजार हेक्टरावर पेरा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वाढत्या क्षेत्राबरोबर उत्पादनही वाढावे ही अपेक्षा व्यक्त होत आहे.
भौगोलिक क्षेत्रानुसार घेतली जाणारी पीके आता उत्पादनानुसार ठरु लागली आहेत. ज्या पिकातून अधिकचे उत्पादन त्यावरच शेतकऱ्यांचा भर. त्यानुसारच नगर जिल्ह्यामध्ये कडधान्यावर भर दिला जाणार आहे. यामध्ये हरभरा, तूर, मूग, उडीद, मसूर, कुळीथ, मटकी, चवळी, सोयाबीन, इत्यादी पिकांचा समावेश होतो. राज्यात सोयाबीनचा पेरा वाढणार तर आहेच पण त्याच बरोबर कापसावरही शेतकरी लक्ष केंद्रीत करीत आहे. नगर जिल्ह्यात फळबागेचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात असले तरी शेतकरी आता नगदी पिकांवर लक्ष केंद्रीत करीत आहेत. जिल्ह्यात प्रामुख्याने बाजरी हे पीक घेतले जात होते पण आता बदलत्या परस्थितीनुसार पीक पध्दतीमध्येही बदल होत आहे.
खरीप हंगामात खताची कृत्रिम टंचाई निर्माण करुन शेतकऱ्यांकडून अधिकची रक्कम घेतली जाते. त्यामुळे जिल्ह्यात तालुकानिहाय एक भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. बियाणे आणि खत हे मागणी प्रमाणे पुरवले गेले असून त्यामध्ये कोणताही गैरप्रकार होणार नसल्याचा विश्वास जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप यांनी व्यक्त केला आहे. कृषी विभागाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन विक्रेत्यांनी केले नाहीतर मात्र, निलंबन किंवा परवाने रद्दची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे योग्य ते दर आकरुन शेतकऱ्यांचे उत्पादन कसे वाढेल यावर लक्ष केंद्रीत असणे गरजेचे आहे. केवळ शहरातच नाही तर ग्रामीण भागातील कृषी सेवा केंद्राचीही पाहणी भरारी पथकाकडून केली जात आहे.
मागील दोन वर्षात कडधान्य पेरणीला प्राधान्य दिलंय. अहमदनगर जिल्ह्यामध्ये 72 हजार हेक्टरवर कडधान्याची होणारी पेरणी यावर्षी तब्बल 2 लाख 19 हजारावर होत आहे. शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये अमूलाग्र बदल केला आहे. शिवाय कृषी विभागाकडूनही वेळोवेळी मार्गदर्शन झाल्याने शेतकऱ्यांनी हा बदल स्वीकारला आहे. आता ज्या पध्दतीने पीक पध्दतीमध्ये बदल केला आहे त्याच प्रमाणे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. तरच कृषी विभागाचा उद्देश साध्य होणार आहे.