नाशिक : द्राक्ष बागायतदारांचा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे. शिवाय आजही शेतकऱ्यांचा कल हा पारंपरिक शेतीवरच आहे. मात्र, पारंपरिक शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि रासायनिक खतांचा अतिवापर झाल्यास संभाव्य धोका ओळखता इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्याने निवडलेला वाट अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. काळाच्या ओघात राज्यात रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. विशेषत: मराठवाड्यात रेशीम शेतीचे क्षेत्र वाढत असताना इगतपुरी येथील शेतकऱ्यानेही रेशीम शेतीचा प्रयोग करुन केवळ उत्पादनात वाढच केली नाही तर बेरोजगारांच्या हातालाही काम मिळवून दिले आहे. विशेष म्हणजे अत्याधुनिक पध्दतीचे तंत्र वापरून हा यशस्वी प्रयोग कृष्णनगरचे शेतकरी सखाहरी जाधव यांनी केला आहे.
राज्यात मराठवाडा हे रेशीम शेतीचे मुख्य केंद्र बनत आहे. विशेषत: जालना येथील वाढते क्षेत्र आणि बाजारपेठेचा आधार केवळ मराठावड्यातील शेतकऱ्यांनाच नाही तर आता उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही मिळत आहे. सखाहरी जाधव यांनी रेशीम शेतीचा प्रयोग दीड एकरामध्येच केला पण तो यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम आणि अत्याधुनिक पध्दती यावर अधिक भर दिला. तुती लागवडीचे सहा महिन्यात पहिले पीक येते. रेशीमच्या अळ्यांना बाजारात 500 ते 600 रुपये किलो प्रमाणे बाजारभाव मिळतो.दर महिन्याला साधारण 1 लाख 80 हजार उत्पन्न त्यांना मिळत आहे. शिवाय यासाठी जालना बाजारपेठ त्यांनी जवळ केली आहे.
रेशीम शेतीचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी जाधव यांनी लागवडापासूनच योग्य ती काळजी घेतली आहे. ठिबकसिंचन, योग्य अंतरावर लागवड, तुती लागवडीसाठी जीवामृत, शेणखत ,गांडूळ खत या सेंद्रिय खतांचा वापर करून उत्पादन मिळाले. जाधव हे महाराष्ट्रात शेतकऱ्यांना देखील मार्गदर्शन देण्याचे महत्वपूर्ण काम करीत असतात. शिवाय या अनोख्या उपक्रमात त्यांना पत्नी तुळसाबाई, वडिल, मुले यांचे देखील सहकार्य लाभत आहे. यंदा रेशीमला चांगला भाव असल्याने वर्षाकाठी त्यांना 8 ते 9 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.
एका शेतकऱ्याचा वेगळा प्रयोग इतरांसाठी प्रेरणादायी हा ठररोच. पारंपरिक शेतीमध्ये होणारा खर्च, रासायनिक खतांचे दुष्परिणाम, जमिनीचा खालावत चाललेला पोत यामुळे जाधव यांनी घेतलेल्या निर्णयाचे फलित आज मिळत आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते आदर्श शेतकरी पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनाचा रेशीम संचानालयतर्फे रेशीम श्री पुरस्कार देखील नाना जाधव यांना मिळाला आहे. पीक पध्दतीमध्ये बदल करण्यासाठी त्यांना बेलगाव कुऱ्हेचे आदर्श शिक्षक विष्णू बोराडे यांनी प्रोत्साहित केले होते.