वर्धा : गतवर्षी निसर्गाच्या लहरीपणात सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले होते. प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना केवळ (Cotton Rate) कापसाने आधार दिला होता. कापसाला मिळालेल्या विक्रमी दराचा परिणाम यंदाच्या कापूस पेरणीवर होणार आहे. (Cotton Market) जागतिक बाजारपेठेत वाढलेली मागणी आणि सध्याही मिळत असलेला दर पाहता शेतकरी यंदा कापसावरच अधिकचा भर देणार असल्याचा अंदाज (Agricultural Department) कृषी विभागाने व्यक्त केला आहे. कापासाचे वाढीव क्षेत्र पाहता कृषी विभागाकडूनही योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. यातच आता कापूस बियाणे विक्रीला सुरवात झाली असून पेरणी योग्य पाऊस झाल्याने यंदा सोयाबीन बरोबर कापसाचेही क्षेत्र वाढणार असल्याचा दावा कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
अर्थार्जानाच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामच महत्वाचा आहे. शिवाय ज्या पिकातून अधिकचे उत्पादन त्याच पिकांवर शेतकरी भर देत असतात. जिल्ह्याच खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र हे 4 लाख 37 हजार हेक्टर असून त्यापैकी जवळपास 2 लाख 15 हजार हेक्टरावर कपाशीचाच पेरा होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. कापसाबरोबर सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांवरही शेतकऱ्यांचा भर राहणार आहे. गेल्यावर्षी 4 लाख 42 हजार 773 हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले होते. त्यापैकी 4 लाख 18 हजार 561 हेक्टरवर प्रत्यक्ष लागवड झाली होती. यावरूनच यंदाच्या खरीपाचे नियोजन करण्यात आले आहे.
राज्यात खरीप हंगामात सोयाबीन हेच मुख्य पीक आहे. मध्य प्रदेशापाठोपाठ सर्वाधिक उत्पादन हे महाराष्ट्रात घेतले जाते. मात्र, गतवर्षीचे दर पाहता शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला आहे. ज्याला अधिकचा दर त्यावर शेतकऱ्यांचा भर अशीच अवस्था स्थानिक पातळीवर आहे. मराठवाड्यातून कपाशीचे क्षेत्र घटत असले तरी विदर्भात मात्र, वाढ होत आहे. त्यामुळे कृषी विभागाला देखील नियोजनात बदल करावा लागत आहे.
यंदा कृषी विभागाच्या धोरणामुळे हंगामापूर्वी शेतकऱ्यांना कपाशीचा पेरा शक्य झाला नव्हता. 31 मे पर्यंत राज्यातच कापूस बियाणे विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कृषी विभागाने वेळेपूर्वी कापूस पेरणी होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला होता. आता सर्वत्र बियाणे विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पेरणीयोग्य पाऊस होताच शेतकरी पेरणीला सुरवात करेल असा आशावाद कृषी विभागाला आहे.