औरंगाबाद : मागणी असली की शेतकऱ्याच्या मातीलाही किंमत मिळते. असाच काहीसा प्रकार सध्या (Cotton Rate) कापसाबाबत होत आहे. यंदाच्या हंगामात केवळ फेब्रुवारी महिना वगळता कापसाचे दर हे चढेच राहिले आहे. सध्या हंगाम अंतिम टप्प्यात असताना देखील ऐ नही झुकेगा..! अशी स्थिती आहे. कापसाचे तर सोडाच पण आता फरदडही भाव खात आहे. (Marathwada) कापसाला विक्रमी 12 हजार रुपये क्विंटल असा दर मिळत आहे. तर दुसरीकडे फरदड कापसाला 10 हजाराचा भाव मिळत आहे. त्यामुळे मुख्य पिकातूनच नाहीतर (Farmer) शेतकऱ्यांनी यंदा फरदडचेही पैसे केले आहेत. शेतकऱ्यांकडील कापूस संपला असला तरी फरदडची विक्री जोमात सुरु आहे. यामधून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडत आहे.
यंदा अतिवृष्टी आणि बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापसाच्या उत्पादनात घट होऊन देखील लागलीच कापसाच्या दरात वाढ झाली नव्हती. सुरवातीला शेतकऱ्यांना 8 हजार रुपये क्विंटलप्रमाणेच विक्री करावी लागली होती. मात्र, दरात वाढ होत नसल्याने पुन्हा शेतकऱ्यांनी विक्रीपेक्षा साठवणूकीवर भर दिला होता. त्यामुळे मागणीपेक्षा बाजारपेठेत पुरवठा कमी असल्याने कापसाच्या दरात वाढ होत गेली. गेल्या 10 वर्षात जो दर कापसाला मिळला नाही तो यंदा मिळाला होता. वर्धा जिल्ह्यातील बाजारपेठेत तर 13 हजार रुपये क्विंटलचा दर मिळाला होता. तर आता औरंगाबाद जिल्ह्यात हंगामाच्या अंतिम टप्प्यात विक्रमी दर मिळी लागला आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने होत गेलेली वाढ विक्रमी दरावर पोहचली आहे.
ज्या शेतकऱ्यांनी योग्य टायमिंग साधले त्यांनाच अधिकचा फायदा झाला आहे. मात्र, कापसाने 10 हजार रुपयांचा पल्ला गाठला त्या दरम्यानच अनेक शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली होती.शिवाय व्यापारी थेट दारातच येत असल्याने ना वाहतूकीचा खर्च ना पैशासाठी वेटींग यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली पण आता दीड महिन्यातच कापसाचे दर 13 हजारांवर पोहचले आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी विक्री केली त्यांचे नुकसान तर ज्यांनी साठवणूक केली त्यांचा फायदा असेच चित्र आहे.
फरदड कापूस म्हणजे हंगाम संपूनही अधिकच्या उत्पादनासाठी कापसाला पाणी देऊन उत्पादन घेणे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते. मूबलक प्रमाणात पाणीसाठा होता. त्यामुळे कापूस मोडणीपेक्षा त्याची जोपासना केली तर आर्थिक लाभ शेतकऱ्यांना होत आहे. तीन ते चार वेचण्या पूर्ण झाल्यानंतरही कापूस शेतामध्ये ठेऊन पाणी देऊन कापसाचे उत्पादन घेतले. त्याचाच परिणाम आता समोर आला आहे. फरदड कापसाला बाजारपेठेत 10 हजार रुपये क्विंटलचा दर मिळाला आहे. मुख्य पिकांना जो दर नाही तो फरदडला मिळाला असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडली आहे.
Latur Market : सोयाबीनची विक्रमी आवक, 5 दिवसाच्या बंद नंतर काय आहे बाजारपेठेतले चित्र?