पुणे : गतवर्षी (Cotton Rate) कापसाला विक्रमी दर मिळाला होता. प्रतिक्विंटल कापूस हा 14 हजार रुपयांपर्यंत पोहचला होता. त्यामुळे यंदाच्या हंगामात (Cotton Area) कापसाचे क्षेत्र वाढणार हे निश्चित होते. त्यानुसार सोयाबीनपाठोपाठ कापसाची लागवड राज्यात झाली आहे. सोयाबीनचे क्षेत्र हे 43 लाख हेक्टरावर आहे तर त्याखालोखाल कापसाने क्षेत्र व्यापले आहे. वाढलेल्या क्षेत्रानुसार उत्पादन वाढून दर घटतील असे तुम्हाला वाटत असेल पण यंदाही कापसाचा तोरा हा कायमच राहणार आहे. कारण क्षेत्र वाढले असली अधिकच्या (Heavy Rain) पावसाने नुकसानही झाले आहे तर दुसरीकडे मागणीही वाढत आहे. त्यामुळे यंदा क्षेत्र वाढूनही पांढऱ्या कापसाला सोन्याचा दर राहणार असा अंदाज आहे.
गतवर्षी घटलेल्या कापूस उत्पादनाचा परिणाम यंदाही जाणवत आहे. कारण देशामध्ये नगण्य कापूस शिल्लक आहे. असे असतानाच सुत गिरण्या ह्या जेवढा आवश्यक तेवढ्याच कापसाची खरेदी करीत आहेत. त्यामुळे भविष्यात कापसाची आयात वाढली जाणार असल्याचे जाणकरांचे मत आहे. मात्र, सर्वत्रच अशी स्थिती निर्माण झाल्याने गरजेपूरताच कापूस खरेदी केला जाऊ शकतो. त्यामुळे गतवर्षी विक्रमी दर मिळाला असताना तेच दर अद्यापही टिकून आहेत. यंदाही अधिकच्या पावसामुळे उत्पादनात घट झाली तर कापसाचे दर हे तेजीतच राहणार असल्याचे चित्र आहे.
दरवर्षी 4 ते 5 हजार रुपये क्विंटल दरापासून कापसाची विक्री सुरु होते. गतवर्षीही अशीच सुरवात झाली होती मात्र, उत्पादन घटल्याने दर वाढतील असा शेतकऱ्यांचा अंदाज होतो. अखेर तो अंदाज हंगामाच्या अंतिम टप्प्यात खराही ठरला. कापसाला प्रति क्विंटल 14 हजार रुपये असा दर मिळाला होता. त्यामुळे यंदा कापसाच्या लागवडीत वाढही झाली. मात्र, हंगामाच्या सुरवातीलाच पावसाने लहरीपणा दाखवला आणि लागवड होताच कापूस पाण्यात गेला आहे. त्यामुळे यंदाही उत्पादनावर परिणाम होऊन दर तेजीत राहणार आहेत. हंगामाच्या सुरवातीलाच 7 हजार रुपये क्विंटल दर मिळण्याचा अंदाज आहे.
गेल्या काही वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांचा भर हा सोयाबीनवरच अधिकचा आहे. मात्र, गतवर्षी कापसाला सोयाबीनपेक्षा दुपटीने अधिकचा दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ओढा पुन्हा कापसाकडेच राहिलेला आहे. यंदा सोयाबीनपाठोपाठ राज्यात कापसाची लागवड झाली आहे. विशेषत: विदर्भात क्षेत्र वाढले आहे. त्याचा फायदा यंदा अधिकचा दर मिळाल्यावर शेतकऱ्यांना होणारही होता पण अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे उत्पादनात घट ही निश्चित मानली जात आहे. आता अधिकचा दर मिळला तरी शेतकऱ्यांकडे कापसाचे उत्पादन घटणार त्याचे काय हा सवाल उपस्थित होत आहे.