मुंबई : कापूस उत्पादक शेतकरी मागील ३ महिन्यांपासून चिंतेत होते, त्यांच्याकडे सरकारने कोणतंही लक्ष दिलेलं नाही हे अगदी स्पष्ट आहे. पण बाजारातील चढऊतार त्यांच्यासाठी आज आशेचा दीप घेऊन आली आहे. आपल्या कापसाला भाव मिळेल या भाबळ्या आशेने शेतकरी डोळे लावून बसला होता, पण व्यापारीही कसायासारखं कमी पैशात शेतकऱ्यांला कापसात नाडू पाहत होता. कमीत कमी भावात कापूस मागत होता. घरात अनेक दिवसांपासून कापूस भरुन ठेवल्याने शेतकऱ्याची चिंता आणखी वाढली होती. लहान बाळ ते मोठ्या लोकांना या कापसातील किडे चावत होते, कातडीचे रोग झाल्यासारखं सर्वांना हातापायांना खाज येत होती. कापूस तसा सांभाळायलाही कठीण आग लागली तर रोखणं कठीण, राखंच हातात येते, त्यामुळे आणखी काळजी.
ऊन वाढत जाणार, वातावरणात उष्णता वाढत जाणार तसं घरात ठेवलेल्या कापसाचं वजनही वाढणार हे देखील चिंतेचंच कारण, कापूस भाव मिळणार म्हणून घरात ठेवला आणि चिंतेनं शेतकरी राजाच्या मनात घर केलं. कापूस रखडला म्हणून हातात, पैसे नाहीत, २ महिन्यावर पावसाळा पण हातात पैसे नसल्याने शेतीची कामंही कोणती करावीत आणि कोणती नाही, हे देखील उमगत नाही.तेव्हा आता कापूस भाववाढीची ही बातमी शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे, आता जास्त भाववाढीची अपेक्षा न ठेवता, देऊन टाकतो अशीच भूमिका शेतकऱ्याला पडवणार आहे.
कारण मे महिन्यात अनेक कापसाच्या जीन या हवा आणि आगीच्या घटना नकोत म्हणून बंद होतात, कापसाचा सिझन संपायला येतो. म्हणून त्या आधीच काही शेतकरी कापूस देऊन ठाकतात. तशीच भूमिका परवडणारी ठरते कारण कापूस घरात ठेवून दिवसेंदिवस उष्णता वाढली तर कापसाचे वजन कमी होते, घरात ओल लागली, किंवा अवकाळी पावसामुळेही कापूस खराब होण्याची भीती असते. म्हणून कापूस विकून हातात पैसे आल्यावर इतर शेतीच्या कामाकडे मोर्चा वळवणे शेतकऱ्याला कधीही परवडतं.
बाजारात कापसाठी आवक मंदावली आहे, मात्र कापसावर दबाव वाढत आहे, म्हणजेच कापसाची मागणी आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड कृउबात कापसाची सर्वात जास्त आवक झाली.१ हजार १३० क्विंटल कापसाची आवक झाली.वर्ध्यात कापसाला आज सर्वाधिक जास्त भाव मिळाला, ८ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल असा कापसाला भाव मिळाला. तर सरासरी भाव, ७ हजार ३०० रुपये असा आहे. मात्र किनवट, भद्रावती, पारशिवनी, उमरेड, वरोरा-माढेली, काटोल येथे कापसाला सरासरी भाव हा ८ हजार रुपये क्विंटलच्या आसपास होता. ही शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे.