अहमदनर : सध्या (Kharif Season) खरीप हंगामाची लगबग सुरु असली तरी कपाशीबाबत कमालीची शांतता आहे. सोयबीन बियाणे, बीजप्रक्रिया यासारख्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे पण कापसाची साधी चर्चाही नाही शिवाय यंदा (Cotton Rate) कापसाला विक्रमी दर मिळाला असताना ही अवस्था झाली आहे. कपाशीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली असली तरी कपाशीवर पडणाऱ्या (Bond larvae disease) बोंडअळी रोगाचा परिणाम काय असतो याची कल्पना कृषी विभगाला सुरवातीपासूनच आहे. त्यामुळे कपाशीची हंगामपूर्व लागवड होऊ नये म्हणून कपाशी बियाणे विक्रीबाबत निर्बंध करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट 1 जून पासूनच बियाणे खरेदी करता येणार आहे. शेतकऱ्यांना कपाशीच्या बियाणांसाठी अजून एक महिन्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
कापसाला विक्रमी दर मिळाल्यामुळे यंदा कापसाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, कपाशीवर वाढत असलेल्या बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हे त्रस्त आहेत. यातच हंगामपूर्व लागवड झाली तर त्याचा परिणाम हा इतर पिकांवरही होणार आहे. बोंडअळीमुळे केवळ पिकांचेच नाही तर शेतजमिनीचेही नुकसान होत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कृषी विभागाने 1 जूननंतरच कपाशी बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करण्याचे धोरण ठरिवले आहे.
कपाशीवर बोंडअळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सन 2017 मध्ये कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे 2018 ते 2021 दरम्यान विविध उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या. बोंडअळीचा जीवनक्रम खंडित न झाल्यामुळे हा प्रादुर्भाव वाढत आहे. हंगामपूर्व कापूस लागवड खंडित न झाल्यामुळे अळीस पोषक वातावरण निर्माण होते. त्याचा प्रादुर्भाव पुन्हा इतर पिकांवरही होतो. त्यामुळे कृषी विभागाने हंगामपूर्व कापूस लागवड करता येऊ नये म्हणून हंगाम संपल्यावरच कापूस बियाणे बाजारात उपलब्ध करुन दिले आहे.
हंगामाच्या अगोदरच बियाणे उपलब्ध झाल्यास शेतकरी त्याची लागवड करतात. म्हणून बियाणे पुरविण्याचा एक कालावधी ठरविण्यात आला आहे. ज्या ठिकाणी बियाणांची उत्पादकता होते तेथून वितरकांपर्यंत 1 ते 10 मे दरम्यान बियाणे पुरविले जाणार आहे. तर वितरकांकडून 15 मे पासून किरकोळ विक्रत्यांना पुरविले जाणार आहे तर किरकोळ विक्रत्यांकडून शेतकऱ्यांना 1 जून नंतर विक्री केले जाणार आहे.