वाशिम : शेती व्यवसायावर अस्मानी किंवा सुल्तानी संकट हे ठरलेले आहे. यंदाच्या दोन्ही हंगामात याचा प्रत्यय आला आहे. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान हे निसर्गाच्या लहरीपणामुळे तर आता (Rabi Season) रबी हंगामात (MSEB) महावितरणने शेतकऱ्यांना असा काय शॉक दिला आहे की, बहरात आलेले पीक पदरात पडते की नाही अशी स्थिती झाली आहे. मध्यंतरी रोहित्राचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर तोडगा निघताच आणि (Irregular power supply) भारनियमन वाढले आहे. त्यामुळे रब्बीसह हंगामी पिकांचे नुकसान होत आहे. भारनियमन निर्णयाचा निषेध करीत जऊळका, कुत्तरडोह, अमानवडी येथील शेतकऱ्यांनी थेट पाण्यात उतरुन आंदोलन केले आहे. प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अशाप्रकारे आंदोलन शेतकऱ्यांनी केले असून आता महावितरण काय निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे.
रब्बी हंगामातील पिकांसाठी आतापर्यंत पोषक वातावरण होते. शिवाय पाणीसाठाही मूबलक असल्याने पिके बहरात आहेत. पण आता अंतिम टप्प्यात पिके असतानाच महावितरणने भारनियमन करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार आहे. यापूर्वी रात्री-अपरात्री विद्युत पुरवठा केला जात होत आता तर नियमित पुरवठाच नसल्याने पिकांची जोपासणा करायची कशी असा सवाल आहे.सुरळीत विद्युत पुरवठा करण्याची महावितरणकडे करुनही दुर्लक्ष केले जात होते. सबंध हंगामात महावितरणने शेतकऱ्यांच्या समस्यामध्ये वाढच केली आहे. त्यामुळे उत्पादनावर याचा परिणाम होणार आहे.
यंदा पीक पध्दतीमध्ये बदल करुन शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा केल आहे. खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार आहे. शिवाय सोयाबीन हे पावसाळी पीक असल्याने त्याला अधिकच्या पाण्याची आवश्यकता असते. पण आता शेंग भरण्याच्या अवस्थेतच वेळेत पाणी मिळत नसल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत. उन्हाळी सोयाबीनचा केवळ उत्पादन म्हणून नाही तर बियाणांसाठीही उपयोगी पडणार आहे. पण महावितरणच्या या भूमिकेमुळे पीक पदराच पडते की नाही अशी स्थिती आहे.
महाविरणच्या निर्णयाचा निषेध कऱण्यासाठी शेतकऱ्यांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट पाण्यात उतरुन आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी नाही तर शेतकरी अडचणीत आणण्यासाठीच सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून जोपर्यंत विद्युत पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन केले जाणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दामू अण्णा इंगोले यांनी सांगितले आहे.
Hapus Mango : कोकणातील हापूसचा आता राज्यभर गोडवा, कलमांसाठी कृषी विभागही लागला कामाला