नगर : उत्पादनात वाढ आणि मार्केटमध्ये भाव पाहिजे असेल तर त्याचे नियोजन हे पेरणी दरम्यानच करावे लागते. (Agricultural Department) कृषी विभागाच्या मदतीने वेगवेगळे उपक्रम राबवणाऱ्या गावांची संख्या फार कमी आहे. मात्र, कृषी विभागाचे मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांचा सहभाग राहिल्यावर काय होऊ शकते याचा प्रत्यय (Ahmednagar) अहमदनगर जिल्ह्यामध्ये आला आहे. (Cotton Crop) कापसाच्या उत्पादनापासून ते विक्रीपर्यंतचे नियोजन करण्यासाठी जिल्ह्यातील 61 गावांमध्ये कापसाचे एकच वाण आणि ते ही एकाच वेळी घ्यावे असे नियोजन करण्यात आले आहे. हा नाविन्यपूर्ण उपक्रम असला तरी राबवला जात आहे. याकरिता 5 हजार 665 हेक्टरावर अशाप्रकारे कापसाची पेरणी होणार आहे.
नगर जिल्ह्यामध्ये कापसाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. मात्र, क्षेत्राबरोबरच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. एकाच वेळी आणि एकच वाणाचे कापूस बियाणे पेरले तर एकाच वेळी पीकही पदरी पडणार आहे. त्यामुळे कापसाला चांगले मार्केटही मिळते. शिवाय उत्पादनाच्या दरम्यान, रोगराईचा प्रादुर्भाव झाला तरी सर्व क्षेत्रातील कापसासाठी एकच मात्रा. असा हा या उपक्रमाचा फायदा असून लोकसहभागातून ही किमया कृषी विभागाने साधली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची एकजूट आणि कृषी विभागाचा पुढाकार याचे अनोखे दर्शन घडते.
नगर जिल्ह्यात चर्चा असलेल्या या ‘एक गाव, एक वाण’यामध्ये जिल्ह्यातील 61 गावातील 5 हजार 665 हेक्टरावर कापसाची पेरणी होणार आहे. जिल्ह्यातील नेवासा, पाथर्डी, शेवगाव या तालुक्यांमध्ये कापसाचे क्षेत्र वर्षानुवर्षे वाढत आहे. शिवाय आता जामखेड, राहुरी, श्रीगोंदा. कर्जत या तालुक्यामध्येही क्षेत्र वाढत आहे. वाढत्या क्षेत्राबरोबर कापसाला वाढता दर मिळाला तर शेतकऱ्यांच्या या उपक्रमाचे उद्दिष्ट साध्य होणार आहे.
नगर जिल्ह्यातील एक गाव, एक वाण यामध्ये नगर तालुक्यातील 9 गावे आणि 774 हेक्टर, पाथर्डी तालुक्यात 13 गावे अन् 1460 हेक्टर, कर्जतमध्ये 3 गावामध्ये 82 हेक्टर, श्रीरामपूरला 2 गावांमध्ये 130 हेक्टर, नेवास्यात 4 गावांमध्ये 480 श्रीगोंद्यात 7 गावात 190 हेक्टर, राहुरीला 4 गावांमध्ये 197 हेक्टर, शेवगाव तालुक्यातील 8 गावांमध्ये 1 हजार 200 हेक्टरी याप्रमाणे 5 हजार 665 हेक्टरवर लागवड केली जाणार आहे.