अमरावती : गतआठवड्यापर्यंत राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याचे डोळे हे आभाळाकडे लागले होते. (Monsoon) पावसाच्या भरवश्यावर जमिनीत गाढलेल्या (Kharif Season) बियाणांचे काय होणार हाच प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होता. मात्र, गेल्या आठ दिवसांमध्ये निसर्गाचा लहरीपणा काय असतो याचा प्रत्यय अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आला आहे. जिल्ह्यातील सावरखेडा परिसरात असा काय (Heavy Rain) पाऊस झाला आहे की, पिकांसह शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. ज्या पावसाची प्रतिक्षा शेतकऱ्यांना होती त्याच पावसाने पिके तर पाण्यात गेली पण आता दुबार पेरणी करावी तरी कुठे हा प्रश्न जमिन खरडून गेल्याने निर्माण झाला आहे. शेतकरी संकटात असताना त्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी ना प्रशासकीय अधिकारी फिरकले आहेत ना लोकप्रतिनीधी.
उत्पादन आणि उत्पन्न या दोन्हीच्या अनुशंगाने खरीप हंगाम महत्वाचा असतो. यंदा पावसाने ओढ दिली तरी जून महिन्याच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांनी पेरणीचे धाडस केले. धूळपेरणी करुन शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होता. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली नाहीतर दुबार पेरणी ही ठरलेलीच होती. पण गेल्या काही दिवसांपासून पावसामधील सातत्य आणि मुसळधार सरी यामुळे पिके तर सोडाच पण शेत जमिनीही देखील खरडून गेल्या आहेत. त्यामुळे पेरणी होऊनही शेतकऱ्यांच्या समस्या ह्या कायम आहेत.
गत महिन्यात प्रतिकूल परस्थिती असतानाही शेतकऱ्यांनी हात उसणे घेऊन चाड्यावर मूठ ठेवली ती ही बेभरवश्याची. असे असताना रिमझिम पावसावर पिकांची उगवणही झाली. मात्र, सावरखेड येथे झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे ना पैसा आहे ना यंत्रणा. शिवाय याचा मेळ घातला तरी ज्या जमिनीवर पेरणी करायची जी जमिनच वाहून गेली आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरवातीला पावसाअभावी खरीप वाया जाणार अशी भीती होती तर आता अधिकच्या पावसाने खरीप वाया गेला आहे.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्या बांधावर जाण्याच्या सूचना केल्या जातात. प्रत्यक्षात स्थिती काय आहे याचा प्रत्यय सावरखेड येथील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यावर येतेय. पावसामुळे होत्याचं नव्हतं झालं आहे. असे असताना शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळणे गरजेचे आहे. पण या शिवरात ना प्रशासकीय अधिकारी फिरकले आहेत ना लोकप्रतिनीधी. पंचनामे करुन तात्काळ मदतीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.