बुलडाणा : (Onion Rate) कांद्याचे दर किती लहरी आहेत याचा प्रत्यय गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील शेतकऱ्यांना येत आहे. सध्या (Onion Arrival)उन्हाळी कांद्याची आवक सुरु आहे. मात्र, (Summer Season) उन्हाळी कांद्याला सुरवात होताच दरात झालेली घट अद्यापही कायम आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला 4 ते 5 रुपये किलो असा दर मिळत आहे. हंगामाच्या सुरवातीला हाच कांदा 3o ते 40 रुपये किलोने विकला गेला आहे. निसर्गाचा लहरीपणा त्यामध्येच कांदा दराची अशी परवड यामुळे कांद्याचा वांदा तर झालाच आहे पण आता वातावरणातील बदलामुळे साठवणूक करावी का विक्री हा सवाल कायम आहे. निसर्गामुळे उत्पादनात घट तर कधी बाजारपेठेतील दराची अनियमितता यामुळे शेतकरी त्रस्त आहे.
उन्हाळी हंगामातील कांद्या काढणीची कामे जोमात सुरु आहेत. भर उन्हात कांदा काढणी, छाटणी ही कामे उरकली जात आहेत. त्यामुळे कांद्याची आवक सुरु होताच थेट दरावरच परिणाम होणार आहे. सध्या ठोक बाजारपेठेत कांद्याला 4 ते 5 रुपये किलो असा दर मिळत आहे. कांदा लागवडीपासून ते काढणीपर्यंत शेतकऱ्यांचाच अधिकचा खर्च झाला आहे. ठोक बाजारात दर नसले तरी किरकोळ विक्रेत्यांच्या माध्यमातून व्यापारी अधिकचा नफा कमावत आहे. शेतकऱ्यांना मात्र कवडीमोल दरातच विक्री करावी लागत आहे.
प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना सरकारने मदत करणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून सरकारच्या धोरणांचा शेतकऱ्यांना फटकाच बसत आहे. इतर वेळी कांदा दरात वाढ झाली तर ग्राहकांना तो कांदा खरेदी करता यावा म्हणून नाफेड कांदा विक्री करतो. मात्र, आता शेतकऱ्यांना कमी दर मिळत असताना नाफेडने अधिकच्या किंमतीमध्ये कांदा खरेदी करणे क्रमप्राप्त असताना याकडे दुर्लक्ष होत आहे. दराने शेतकरी मेटाकूटीला आला असताना सरकारने त्याला उभे करणे गरजेचे आहे.
कांद्याचे दर घटताच किमान लागवड खर्च आणि केलेले परिश्रम याचे चीज होण्यासाठी सरकारने कांदा उत्पादकांना अनुदान रुपी मदत करणे गरजेचे आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याची मागणी होत असताना दुर्लक्ष होत आहे. अन्य 30 रुपये किलो हा हमीभाव देण्याची मागणी कांदा उत्पादक संघटनेने केली आहे.