वाशिम : (Maharashtra) राज्यात पावसाने हजेरी लावली असली तरी सर्वत्र पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. असे असतानाही काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवली आहे. त्यामुळे भविष्यात (Re-Sowing) दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वीच योग्य निर्णय घेतला तर शेतकऱ्यांच्या फायद्याचे राहणार आहे. बरेच शेतकरी वळीवाचा पाऊस पडल्यावर पेरणी आटोपून घेतात मात्र पावसाने दडी मारल्यास पिक सुकण्याचे किंबहुना दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर येते. त्यामुळे अलीकडे झालेल्या पावसाने जमिनीत 4 ते 6 इंच ओलावा असल्यासच पेरणीचा निर्णय घ्यावा असे आवाहन (Agronomist) कृषितज्ञ डॉ.भरत गिते यांनी केले आहे. खरिपाबाबत यंदा शेतकऱ्यांची अडचण झाली असून सर्वकाही पावसावर अवलंबून राहणार आहे.
पावसाअभावी खरीप पेरण्या रखडल्या असल्या तरी ज्या शेतकऱ्यांकडे पाणीसाठा आहे अशा शेतकऱ्यांनी पिक उगवणी नंतर हलके संरक्षित ओलित करावे. तसेच उगवणीनंतर जमीनीमध्ये ओलावा टिकुन राहण्याच्या दृष्टीने व किडीचा प्रादुर्भाव कमी होण्याकरीता पिक 15 दिवसाचे झाल्यानंतर डवरणीची व इतर आंतर मशागतीची कामे करावी. त्यामुळे पाण्याचा योग्य वापर केला तर पीक उगवणीपर्यंत शेतकऱ्यांना चिंता नाही. मात्र, भविष्यात पावसाचे आगमन झाले तरच या पिकांना जीवदान मिळणार आहे. पेरणीयोग्य पाऊस झाला की नाही याचे मापन कसे करायचे यावर आधारित प्रात्यक्षिक डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषी संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.भरत गिते यांनी शेतकऱ्यांना करून दाखविले.
ज्या भागामध्ये पुरेसा पेरणी योग्य पाऊस झालेला नाही अशा शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, जेणेकरुन दुबार पेरणीचे संकट येणार नाही, ८० ते १०० मीमी पाऊस पडलेला असतांना किंवा जमीनीमध्ये 4 ते 6 इंच ओलावा गेलेला असतांना किंवा जमीनीमध्ये टिचभर ते इतभर ओलावा गेलेला असतांना पेरणी करावी असे आवाहन डॉ. प्रा. भरत गिते शास्त्रज्ञ, शंकरराव तोटावार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी वाशिम यांच्यावतीने करण्यात येत आहे.
पावसामध्ये सातत्य नसल्याने यंदा खरीप हंगामाचे गणितच बिघडले आहे. आतापर्यंत पीक पेरणी होऊन शिवार हिरवेगार होणे अपेक्षित असताना राज्यात सरासरीपेक्षा निम्म्या क्षेत्रावरही पेरण्या झालेल्या नाहीत. सोयाबीन हे हंगामातील मुख्य पीक असून याचाही पेरा रखडलेला आहे. पावसावरच खरिपाचे भवितव्य ठरणार आहे .15 जुलैपर्यंत खरीप हंगामातील पेरण्या झाल्या नाहीत तर मात्र उत्पादनात घट निश्चित मानली जात आहे.