भंडारा : यंदा मान्सूच्या बाबतीत (Meteorological Department) हवामान विभागाचा अंदाज काही प्रमाणात का होईना चुकीचा ठरला आहे. विविध बाबींचा अभ्यास करुन हा अंदाज बांधला जातो. त्याला वेगळे असे महत्वही आहे पण दुसरीकडे आजही समाधानकारक पावसासाठी वेगवेगळ्या (Succession) परंपरा ह्या जोपासल्या जातात. आता बघा ना भंडारा जिल्ह्यातील पांजरा बोरी या गावात गेल्या अनेक वर्षापासून समाधानकारक पावसासाठी चक्क बाहुला-बाहुली चे लग्न लावले जाते ते ही अगदी दणक्यात. या (Wedding ceremony) लग्न सोहळ्यात अख्ख गाव त्यात वऱ्हाडी मंडळी म्हणून सामिल होते. पावसाबोरबरच शेतीचे उत्पादन वाढावे, रोगराईपासून गावाचा बचाव व्हावा एवढेच नाही तर गावात सुख शांतीसाठी या लग्न सोहळ्याचे आयोजन केले जाते.
बाहुला-बाहुलीचे लग्न असले तरी सर्वकाही विधीवत होते. गावात मोठा लग्न मंडप तयार केला जातो. अर्धे गाव बाहुली वधु कडून व उरलेले अर्धे गाव बाहुल्या नवर देवाकडून मंडपात हजेरी लावते. एवढेच नाहीतर नवरदेवाकडील मंडळी डीजे च्या तालावर नाचतगाजत लग्न मंडपी पोहचते. बाहुली कडील मंडळीने यथोचित मानपान करून बाहुल्याला मंडपात आनत मंगलाष्टके म्हणत लग्न सोहळा पार पडला जातो. लग्न सोहळ्यानंतर जेवणाच्या पंगती त्या वेगळ्याच. सर्व गावकऱ्यांच्या मदतीमधून ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून जोपासली जात आहे.
कोणत्याही परंपरेमागे काही ना काही कारण असतेच. पांजरा बोरी गावच्या या बाहुला-बाहुली लग्नाच्या गोष्टीमागेही कारण तसेच आहे. चार वर्षापूर्वी या गावाकडे पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे दुष्काळजन्य परस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत होते. नापिकेने शेतकऱ्यांवर संकट ओढावले तर प्रत्येकावर कर्जाचा बोजा वाढत चालला होता. त्यामुळे वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी काय करावे या विचारात ग्रामस्थ होते. दरम्यान, एक लहान मुलगी ही खेळण्यातील बाहुला-बाहुलीचे लग्न लावून पाऊस पडण्याची प्रार्थना करीत होती. त्याचवेळी ग्रामस्थांनी आपणही अशाच प्रकारे बाहुला-बाहुलीचे लग्न लावू पण मोठ्या दिमाखात.चार वर्षापूर्वी मोठ्या दिमाखात बाहिला-बाहुलीचा लग्न सोहळा पार पडला आणि गावकऱ्यांनी पावसासाठी नवस बोलला. आश्चर्य म्हणजे त्याच वर्षी चमत्कार झाला आणि सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला. त्यामुळेच ही परंपरा गावकऱ्यांनी कायम ठेवलेली आहे.
गेल्या चार वर्षापासून सुरु झालेली परंपरा यंदाही कायम आहे. यामुळे गाव शिवारात पाऊस तर होत आहेच पण या अनोख्या लग्न सोहळ्यामुळे गावात कोणती रोगराई नाही की कोणती समस्या नाही. शेती उत्पादनात वाढ झाली आहे. एवढेच नाही तर या परंपरमुळेच कोरोनाकाळातही गाव सुरक्षित राहिल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.