नागपूर : (Nitin Gadkari) नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्री असले तरी राजकारणाच्या पलिकडे जाऊन त्यांची वेगळी ओळख निर्माण होत आहे. शिवाय त्यांची रोखठोक वक्तव्य ही कायम चर्चेचा विषय राहिलेली आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या (Agricultural prices) शेतीमालाला बाजारपेठ कशी मिळेल याबाबत ते नागपुरात मार्गदर्शन करीत होते. (Agricultural Production) शेती उत्पादन आणि बाजारपेठ याबाबत आयोजित कार्यक्रमात त्यांनी सरकारच्या भरवश्यावर राहू नका, हे मी सरकारमध्ये असतानाही तुम्हाला सल्ला देत असल्याचे सांगितले. तर सरकारकडून शेतीमालाला हमीभाव मिळेल आणि मग मालाचे दर वाढतील यावर अवलंबून न राहता उत्पादन वाढीबरोबर बाजारपेठ शोधण्यावरही लक्ष असणे आवश्यक आहे, असा त्यांचा सूर होता.
भारतामध्ये केवळ परमेश्वर आणि सरकार या दोघांवरच विश्वास ठेवला जातो. पण त्यामुळे सर्वकाही साध्य होईल असे नाही. त्यासाठी तुमचे प्रयत्नही गरजेचे आहेत. शेतकरी आता उत्पादन वाढीवर भर देत आहे, पण मार्केटचे काय? त्यामुळे मार्केटही येथेच आहे त्याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. सध्या सेंद्रिय शेतीमालाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्याचे उत्पादन वाढवून उत्पन्नही वाढवा असा सल्ला त्यांनी दिला.
आश्वासने आणि त्याची पूर्तता यामध्ये मोठा फरक आहे. त्यामुळे कुणाच्याही भरवश्यावर राहू नकात. शेतीमालाचा दर आपोआप वाढणार नाहीतर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न हे करावेच लागणार आहेत. आणि जर असे झाले नाहीतर नुकसान सरकारचे नाही तर तुमचेच होणार आहे. त्यामुळे तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार याप्रमाणे वाटचाल करा यश नक्की मिळेल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
रासायनिक पद्धतीचा अवलंब करुन पिकवलेला शेतीमाल हा आरोग्यासाठी हानिकारक आहे. शिवाय सेंद्रिय पद्धतीने घेतलेल्या मालाची चवही वेगळीच असते. काळाच्या ओघात पुन्हा सेंद्रीय पद्धतीने पिकवलेल्या मालाला मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती ही अंमलात आणणे गरजेचे आहे. उत्पादनवाढीच्या नादात शेतीमालाच्या दर्जाकडे दुर्लक्ष होत असल्याचेही ते म्हणाले.