नाशिक : टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा आनंद फार काळ टिकला नाहीये. मागील महिन्यात टोमॅटोला 80 ते 100 रुपये किलो इतका भाव मिळत होता. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दोन पैसे चांगले मिळत असल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यात काही ठिकाणी तर टोमॅटोचा शेतातच लाल चिखल झाल्याचे बघायला मिळत होते. दिवाळीनंतर चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र तसे न होता शेतकऱ्यांचा पदरी निराशा पडली आहे. टोमॅटोचे दर आवक घडल्याने मोठ्या प्रमाणात घसरले आहे. 20 ते 25 रुपये किलो इतके दर झाले असून टोमॅटो उत्पादक शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे. नाशिकच्या विविध बाजारात समितीत दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवाक होत आहे. दरम्यान कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून टोमॅटोची मोठ्या प्रमाणात देशभरात आवक होऊ लागल्याने नाशिकच्या शेतकऱ्यांना त्याचा फटका बसू लागला आहे.
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बाजार समिती, नाशिक बाजार समिती, गिरणारे बाजार समितीमध्ये सर्वाधिक टोमॅटो उत्पादक शेतकरी येत असतात.
टोमॅटोसाठी ह्या तीन बाजारसमित्या असल्याने येथे मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक होत असते, त्यामुळे व्यापारी देखील मोठ्या प्रमाणावर येत असतात.
बाजार समितीत टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने टोमॅटोच्या दरात मोठी घसरण होऊ लागली आहे. 80 ते 100 रुपयांवरून भाव थेट 20 ते 30 रुपयांवर येऊन ठेपले आहे.
सध्याची परिस्थिती पाहता टोमॅटोचे दर आणखी गडगडण्याची शक्यता आहे. त्यामुळं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.