बुलाडाणा : सलग दहा दिवस सुरु असलेल्या (Rain) पावसाने आता कुठे उसंत घेतली आहे. पुनर्वसु नक्षत्रातील या पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यातील (Kharif Crop) खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. पावसाने उघडीप दिली असली तरी शेतकऱ्यांसमोरील समस्या ह्या कायम आहेत. रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांवर (Prevalence of larvae) अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. शिवाय तणाचाही जोर वाढत असल्याने शेतकऱ्यांना आता फवारणीशिवाय पर्यायच उरलेला नाही. मध्यंतरीच्या पावसामुळे शेती कामे रखडली होती. समाधानकारक पावसाने पिकांची वाढ होईल असा आशावाद असतानाच आता अळी आणि तण दोन्हीही वाढत आहे. शेतकऱ्यांसमोरील समस्या ह्या कायम असून आता पीक फवारणीसाठी अधिकचा खर्च करावा लागणार आहे.
पावसामुळे सोयाबीन, उडीद, मूग या खरिपातील पिकांमध्ये तण वाढत आहे. त्याचा परिणाम पिकांवर होत असून शेतकरी हातडूबे आणि बैलजोडीच्या सहाय्याने मशागतीचे काम करीत आहे. मात्र, सध्याच्या रिमझिम पावसामुळे तणवाढीचा जोर कायम असल्याने तणनाशकाच्या फवारणीचीही कामे सुरु आहेत. पावसाने दिलासा दिला असला तरी वातावरणातील बदलाचा परिणाम थेट पिकांवर होत आहे. त्यामुळे तणनाशकाबरोबर कीडनाशकाच्या फवारणीची कामे जोमात सुरु आहेत. यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार मात्र वाढलेला आहे.
बुलाडाणा जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन हेच मुख्य पीक आहे. शिवाय यंदा कडधान्याच्या पेरणीला उशिर झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनवरच भर दिला आहे. असे असताना आता ढगाळ वातावरणामुळे पिकावर अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. पिकांची जोपासणा केली तरच भविष्यात उत्पादनात वाढ होणार आहे. त्यामुळे अधिकचा खर्च करुन पीक जोपासण्यावर शेतकरी भर देत आहे. शिवाय उत्पादन आणि अर्थार्जनाच्या अनुशंगाने हाच हंगाम महत्वाचा आहे.
फवारणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी आगोदर पिकांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. पिकांच्या नुकसानीची पातळी पाहताना 4 लहान अळ्या प्रतिमिटर ओळीत आढळल्यास शिफारसीत कीटकनाशकांचा वापर करावा. यामध्ये प्रोफेनोफॉस 20 मिली किंवा क्लोरॲट्रानिलीप्रोल 3 मिली किंवा इन्डोक्साकार्ब 6.6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून नॅसपॅक पंपाने फवारणी करावी लागणार आहे. त्यामुळे अळीचा प्रादुर्भाव कमी होणार आहे.