पुणे : (The vagaries of nature) निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हे त्रस्त आहेत. सततच्या पावसामुळे शेतीकामे तर रखडली आहेतच पण जमिनीत गाढलेले आता पदरी पडते की नाही अशी स्थिती आहे. हे कमी म्हणून महावितरणचा हलगर्जीपणा शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. शिरूर तालुक्यातील आण्णापूर येथे खांबावरील (Electric wire) विद्युत तार तुटून विद्युत प्रवाह जमिनीत उतरल्यामुळे (Death of sheep) 8 मेंढयांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये अविनाश माळी यांना आर्थिक फटका तर बसलेलाच आहे पण आता पुन्हा मेंढ्यांचा अशाप्रकारे सांभाळ होईल की नाही याबाबतही त्यांना चिंता आहे. मेंढ्या चारण्यासाठी गेलेल्या आजींनाही विजेचा शॉक बसला सुदैवाने त्या बचावल्या आहेत.
शिरूर तालुक्यातील अण्णापूर येथील मेंढीपाळ माळी हे आपल्या आजी सोबत मेंढ्या चारण्यासाठी रानात गेले होते. दरम्यान, विद्युत तार तुटल्यामुळे आणि आकड्यामुळे आर्थिंग मधून विद्युत प्रवाह जमिनीत उतरला गेला होता. मात्र, याबाबत सर्वजणच अनभिज्ञ होते. मेंढ्या चरत असताना त्यांना विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने ही दुर्देवी घटना घडली. मेंढपाळालाही विद्युत धक्का लागला होता. परंतु त्यांना लांब फेकल्यामुळे ते बचावले गेले. याप्रकरणी महावितरणने सर्व सखोल चौकशी करून मेंढपाळाला मदत करावी, अशी मागणी परीसरातील नागरीक करत आहे.
शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस या ठिकाणी मागील महिन्यात भिमानदीकाठी कृषी पंपाचा विदयुत प्रवाह नदीपात्रात उतरला गेला होता. दरम्यान, गायी पाणी पिण्यासाठी गेल्या असता 6 गायींचा मृत्यू झाला होता. शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे इतर गायी वाचल्या होत्या. तसेच अनेक ठिकाणी विदयुत तारा जीर्ण झाल्या असून त्या बदलण्यासाठी महावितरणची उदासीनता दिसून येत आहे. महीनाभरात ही दुसरी घटना आहे. त्यामुळे महावितरणने याकडे लक्ष देऊन दुरुस्तीची कामे करुन घेणे गरजेचे झाले आहे.
महिनाभरात शिरुर तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मुक्या जनावरांना आपले प्राण गमवावे लागले आहे. शिवाय यातून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय अशाप्रकारे जनावरांचा मृत्यू झाला तर तातडीने आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे अण्णापूर येथील माळी आणि रांजणगाव येथील शेतकऱ्याला देखील पंचनाम्याप्रमाणे तातडीने मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.