Rabi Season : वातावरण निवळले, शेतकऱ्यांनो लागा कामाला, पीक संरक्षणासाठी काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

| Updated on: Jan 20, 2022 | 11:12 AM

महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर का होईना गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यभरातील वातावरण निरभ्र झाले आहे. त्यामुळे रखडलेल्या कामांना गती तर येणार आहे पण रब्बी हंगामातील पिकांच्या संरक्षण करण्यासाठीही हीच योग्य वेळ आहे.

Rabi Season : वातावरण निवळले, शेतकऱ्यांनो लागा कामाला, पीक संरक्षणासाठी काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?
पिकांची फवारणी
Follow us on

लातूर : महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर का होईना गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यभरातील वातावरण निरभ्र झाले आहे. त्यामुळे रखडलेल्या कामांना गती तर येणार आहे पण (Rabi Season) रब्बी हंगामातील पिकांच्या संरक्षण करण्यासाठीही हीच योग्य वेळ आहे. मध्यंतरीच्या प्रतिकूल वातावरणामुळे गहू, हरभरा, कांदा यासह सर्वच पिकांवर (pest infestation) कीड- रोगराईचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे याचे व्यवस्थापन करणे खर्चीक असले तरी (Farmer) शेतकऱ्यांना ते करावेच लागणार आहे. सध्या अवकाळी आणि ढगाळ वातावरण नाही. शिवाय थंडीही कमी झाली आहे. त्यामुळे कीड-रोगराईचे व्यवस्थापन करण्यास शेतकऱ्यांनी टाळाटाळ करु नये आज पिकांची काळजी घेतली तरच उद्या उत्पादन पदरी पडणार असल्याचा सल्ला कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी दिला आहे.

कोणत्या पिकांचे संरक्षण गरजेचे?

रब्बी हंगामातील पेरण्या होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. मात्र, पिकांची उगवण होताच अवकाळी पाऊस अन् ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर घाटीअळीचा तर आता आठवड्याभरापासून गव्हावरही तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. ही दोन पिके रब्बी हंगामातील मुख्य पीके आहेत. यावरच शेतकऱ्यांचे उत्पादन अवलंबून आहे. तर यंदा शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला असून उन्हाळी सोयाबीनवर बदलत्या वातावरणाचा परिणाम झालेला नाही पण कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. शेतकऱ्यांसाठी ही खर्चीक बाब असली तरी पिके ऐन बहरात असतानाच झालेल्या प्रादुर्भावापासून संरक्षण करणे गरजेचे आहे.

मुख्य पिकांवरील किडीचे असे करा व्यवस्थापन

रब्बी हंगामात हरभरा, गहू ही दोन मुख्य पीके आहेत. शिवाय उन्हाळी कांद्याच्या क्षेत्रातही वाढ झाली आहे. त्यामुळे हरभरा पिकाचे व्यवस्थापन करताना, पहिली फवारणी पीक 50 टक्के फुलोऱ्यात असताना, निंबोळी अर्क, ॲझाडिरॅक्टिन 5 मि.लि प्रति लिटर, एचएएनपीव्ही 500 एलई हे किंवा 1 मिलि प्रति लिटर किंवा क्विनॉलफॉस 2 मि.लि पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी लागणार आहे तर अशाच पध्दतीने दुसरी फवारणी इमामेक्टीन बेंझोएट 0.3 ग्रॅम किंवा क्लोरॅण्ट्रानिलिप्रोल 0.25 मिलि, फ्ल्यूबेंडायअमाइड 0.5 मिलि किंवा बिव्हेरिया बॅसियाना 6 ग्रॅम याचे मिश्रण 1 लिटर पाण्यात मिसळून ही 15 दिवसाच्या अंतराने करावी लागणार आहे.

गव्हावरील तांबेरा : तांबेरा रोगाचे वेगवेगळे प्रकार आहेत. हा रोग पानावर, खोडावर, ओंबीवर आढळतो. पानावर सुरवातीला लहान तपकिरी ठिपके दिसतात आणि त्यातूनच विटकरी रंगाची बिजाणू बाहेर पडतात. लांबट , गोल ठिपके दोन शिरांमध्ये वाढतात. अनेक ठिपके मिळून सर्वच पान व्यापून जाते. रोगाचे लक्षण दिसून येताच 2 ते 2.5 ग्रॅम डायथेन एम- 45 प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास शेतकऱ्यांचा फायदा होतो.

कांद्यावरील करपा: करपा रोगाचा प्रादुर्भाव होताच मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल 10 मिली या बुरशीनाशकांची फवारणी जांभळा, तपकिरी आणि काळा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात मिसळून करणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या :

राज्यात रेशीम कोषचे विक्रमी उत्पादन अन् दर्जाही सर्वोत्तम, कशामुळे बदलले चित्र? वाचा सविस्तर

Summer Season: ज्वारीचे क्षेत्र घटले तरी चाऱ्याची चिंता कशाला? शेतकऱ्यांनी शोधला हा पर्याय..!

पोकरा योजनेच्या माध्यमातून मृद अन् जलसंधारण कामांना गती द्या : कृषीमंत्री दादा भुसे