शिर्डी : शेतीमालाला योग्य बाजारपेठ मिळावी याकरिता केंद्र सरकार कृषी उडाण योजना राबवत आहे. मात्र, या योजनेत शिर्डी विमानतळाचा सहभाग होत नसला तरी स्पाईस जेट कंपनीच्या कार्गो विमानसेवा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. (Export of agricultural produce) शेतीमालाची निर्यात वेळेत होत असल्याने योग्य (fair rates) दर तर मिळतच आहे मात्र, या सेवेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झालेली आहे. शेतीमालाची विदेशात विक्री होत आहे. त्यामुळे परकीय चलनामुळे अधिकचा फायदा होत आहे. गेल्या दीड महिन्यांमध्ये येथील विमानतळावरुन तब्बल 60 टन शेतीमालाची निर्यात करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळत आहे.
मुख्य पिकांपेक्षा दररोज लागणाऱ्या भाजीपाल्याची निर्यात येथील विमानतळावरुन चेन्नईला केली जाते. चेन्नई येथील व्यापारी हे शिर्डी आणि परिसरातील शेतकऱ्यांचा माल खरेदी करतात. यामध्ये प्रामुख्याने शेवगा, ब्रोकली, लसणाची पात अशाच पालेभाज्यांचा अधिकचा समावेश आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही स्थानिक बाजारपेठेपेक्षा अधिकचे पैसे मिळतात. प्रवाशी वाहतूक असलेल्या या विमानातच ही शेतीमालाची वाहतूक करण्याची सोय केली आहे. सुरवातीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद नव्हता पण आता गेल्या दीड महिन्यातच 60 टन शेतीमालाची वाहतूक झाली आहे. शेतीमाल निर्यातीचा फायदा आता शेतकऱ्यांच्या लक्षात आला असून अजून निर्यात वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या स्पाईस जेट कंपनीच्या कार्गो विमानाच्या वेळेप्रमाणे शेतकरी शेतीमाल निर्यात करीत आहेत. केवळ शिर्डी आणि लगतच्या शेतकऱ्यांनाच हे शक्य आहे. त्यामुळे भविष्यात निर्यात मोठ्या प्रमाणात वाढल्यास विमानतळावर स्वतंत्र टर्मिनल आणि शीतगृहाची सोय करण्याची मागणी आता शेतकरी करु लागले आहेत. सध्या केवळ शिर्डी आणि लगतच्या भागातील शेतकऱ्यांचाच शेतीमालाची निर्यात होत आहे. उद्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाची वाहतूक होऊ शकते. या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकचा नफा होत असून योग्य ती सोय करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
सध्या शेतीमालाची वाहतूक ही प्रवाशांच्या विमानातूनच होत आहे. यासाठी स्वतंत्र अशी व्यवस्था करण्यात आलेली नाही. मध्यंतरीच औरंगाबाद विमानतळावरही आता कृषी उडाण योजना सुरु करण्यात आली आहे. त्याप्रमाणेच शेतीमालाची आवक मोठ्या प्रमाणात झाली तर शिर्डी विमानतळाचाही या योजनेत समावेश करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. विमानतळावर योग्य सोई सुविधा मिळाल्या तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य दर मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.