वर्धा : संकटे आली तर ती चोहीबाजूनेच येतात. गेल्या काही दिवसांपासून (Watermelon Rate) कलिंगडच्या दरात घसरण सुरु आहे. अवघ्या महिन्याभरातच (Watermelon) कलिंगडचे दर हे निम्म्यावर आले आहेत. हे कमी म्हणून की काय जिल्ह्यातील बेलोरा गावच्या शिवारात रानडुक्करांनी कलिंगड उध्वस्त केले आहेत. एकाच रात्रीतून तब्बल अडीच एकरातील (Watermelon Damage) कलिंगड उध्वस्त केल्याने शेतकऱ्याचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. दरवर्षी उन्हाळी हंगामातील पिकांना रानडुक्करांच्या उपद्रवचा त्रास हा ठरलेलाच आहे. असे असतानाही वनविभागाकडून कोणतिही उपाययोजना केली जात नाही हे विशेष.
वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील बेलोरा येथील प्रफुल्ल जाणे यांनी अडीच एकरामध्ये कलिंगडची लागवड केली होती. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे मार्केट मिळाले नाही तर आता किलंगड ऐन बहरात असतानाच रानडुकरांनी ते उध्वस्त केले आहे. यामध्ये लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी जाणे यांनी सांगितले आहे. या भागात रानडुक्करांचा हैदोस वाढत असून शेतकरी त्रस्त आहेत. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
जाणे यांनी तब्बल अडीच एकरावर कलिंगडची लागवड केली होती. त्यामुळे गतवर्षी झालेले नुकसान यंदा भरुन निघेल असा विश्वास जाणे यांना होता. शिवाय योग्य प्रकारे जोपासणा केल्याने पीकही बहरात होते. आता 10 दिवसांवर तोडणी आली होती. असे असले तरी दुसरीकडे कलिंगडच्या दरातही घट झाल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम होणार होता. पण हे सर्व घडण्यापूर्वीच वावरातले कलिंगड बाहेर येण्यापूर्वीच उध्वस्त झाले होते.
हंगामाच्या सुरवातीला 15 ते 16 रुपये किलो असे कलिंगडचे दर होते. मागणीच्या तुलनेत पुरवठा नव्हता शिवाय बाजारपेठा पूर्ण क्षमतेने खुल्या झाल्याने मागणीही वाढली होती. हंगामाच्या सुरवातीला बाजारपेठेतले चित्र हे वेगळेच होते. शिवाय रमजान महिन्यात दर आणखीन वाढतील अशी आशा उत्पादकांना होती पण अचानक आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. 8 ते 10 रुपये किलोने कलिंगडची विक्री होऊ लागली आहे. त्यामुळे घसरते दर आणि त्यात पुन्हा वन्यप्राण्यांकडून झालेले नुकसान हे शेतकऱ्यांसाठी नुकसानीचे ठरत आहे.