वाशिम | 5 मार्च 2024 : वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील इंझोरी गावातील शेतकरी दाम्पत्याने शेतीतील केलेल्या नवनव्या प्रयोगाला शासनाने गौरविले आहे. पतीच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबणाऱ्या, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतात नव-नवीन प्रयोग करणाऱ्या उच्च शिक्षित महिला शेतकरी पुजा ढोक यांना यंदाचा जिजामाता कृषी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर त्यांचे पती अजय ढोक यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर झाला आहे. अंतराळ असो वा युद्धभूमी प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आव्हाने पेलत आहेत. कृषीप्रधान देश असलेल्या भारतात महिलांचे शेती व्यवसायात मोलाचे योगदान आहे. इंझोरी गावच्या रहीवासी असलेल्या पूजा ढोक यांना मिळालेल्या यंदा जिजामाता कृषी भूषण पुरस्काराने गावकरी आनंदले आहेत.
शेतीकडे उद्योग म्हणून पाहल्यास अल्प क्षेत्रातही चांगले उत्पादन घेता येते हे ढोक दांपत्याने दाखवून दिले आहे. कृषी क्षेत्रात आजवर केलेल्या नावीन्यपूर्ण प्रयोगाबद्दल इंझोरीच्या या ढोक दांम्पत्याला विविध पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. पुजा ढोक यांना 2021 चा जिजामाता कृषी भूषण तर त्यांचे शेतकरी पती अजय ढोक यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाला आहे. आजची युवा पिढी शेतात राबायला तयार नसते. इतकेच काय तर बहुतांश मुलींनाही आपला जीवन साथीदार म्हणून शेतकरी नको असतो. मात्र वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील अजय ढोक आणि पुजा ढोक या उच्चशिक्षित शेतकरी दांपत्याने शेतीत राबून, मातीची सेवा करून तरुणाईसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
पुजा ढोक या पारंपारिक शेतीबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतः शेतात काम करतात. त्या ट्रॅक्टर चालवितात, नांगरणी, डवरणी,फवारणी तसेच विविध आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर शेतात करतात. आरोग्यवर्धक खपली गव्हाचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या ढोक दांपत्याने आपल्या शेतात छोटासा वेयर हाऊस तयार केला आहे. अतिशय लहान असणाऱ्या तीळाची पेरणी करण्यासाठी कमी खर्चात त्यांनी प्लास्टिक बॉटलच्या सहाय्याने तयार केलेले तीळ पेरणी यंत्र जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना तीळ लागवडीसाठी उपयुक्त ठरत आहे. वन्य प्राणी आणि मानवी संघर्ष टाळण्यासाठी शेत बांधावर किसान सन्मान निधीच्या पैशातून निंबाची केलेली लागवड बारमाही उत्पन्नाबरोबरच शेतीचेही वन्यप्राण्यांपासून सरंक्षण करण्यास उपयोगी ठरत आहे.