पुणे : निसर्गाच्या लहरीपणामुळे (Crop Damage) पिकांचे नुकसान झाले तर किमान आर्थिक मदतीचा हातभार मिळावा यासाठी सुरु करण्यात आलेल्या (Crop Insurance) पंतप्रधान पीकविमा योजनेचा खऱ्या अर्थाने उपयोग यंदाच्या (Kharif Season) खरिपात झालेला आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच लागून राहिलेला पाऊस आणि योजनेचे बदललेले स्वरुप यामुळे राज्यातील तब्बल 92 लाख शेतकऱ्यांनी योजनेत सहभार नोंदवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 8 लाख शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. तर विमा योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल 54 लाख 34 हजार 552 हेक्टराचे क्षेत्र संरक्षित झाले आहे. खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा सर्वाधिक क्षेत्रावर झाला आहे. त्यामुळे विमाही सोयाबीनचाच अधिक उरवण्यात आला आहे. प्रिमीअम रक्कम ही सर्वाधिक असताना देखील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचाच अधिक विमा काढला आहे.
पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढला असला तरी वीस जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा सहभाग वाढला आहे. उर्वरित जिल्ह्यातूनच शेतकऱ्यांची सहभाग होण्याची संख्या ही वाढली आहे. तर दुसरीकडे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, जळगाव, नगर, पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, वर्धा, लातूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यातून शेतकऱ्यांची संख्या घटली आहे. सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा योजनेतील सहभाग वाढलेला आहे.
यंदा खरीप हंगामातील 54 लाख 34 हजार हेक्टरावरील क्षेत्रावर संरक्षण कवच राहणार आहे. राज्यातील 92 लाख शेतकऱ्यांनी ह्या योजनेत सहभाग नोंदवला आहे. योजनेतील बदलाचा स्विकार शेतकऱ्यांनी केला असून यंदा अधिकच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना त्याचा अधिकचा मोबदला मिळणार आहे. यंदा राज्य सरकारने केलेल्या बदलामुळे 7 लाख 97 हजार 135 शेतकऱ्यांचा सहभाग वाढला आहे. त्यामुळे वाढलेला सहभाग आणि शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला किती हे पहावे लागणार आहे.
बीड पॅटर्नमध्ये विमा हप्त्याचे दायित्व हे 80:110 असे असणार आहे.विमा कंपनीला द्यावी लागणारी नुकसान भरपाई 110 टक्के पेक्षा अधिक असेल तर वरची रक्कम राज्य सरकार देईल आणि सदर नुकसान भरपाई ही 80 टक्के पेक्षा कमी असेल तर कंपनीला खर्चापोटी 20 टक्के रक्कम देऊन उर्वरित रक्कम राज्य सरकार घेणार आहे. असे स्वरुप असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान टळणार आहे. योजनेचे स्वरुप बदलल्यामुळे देखील शेतकऱ्यांचा सहभाग वाढला आहे.