नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शेतकरी (Farmer) शेतीमालाला भाव कमी मिळत असल्याने अडचणीत आला आहे. आता अवकाळी पावसाने दुहेरी संकट निर्माण झालंय. या अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यातील जवळपास चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे. यात सर्वाधिक नुकसान हे गहू, द्राक्षे (Grapes Crop) आणि कांदा पिकाचे झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून नेल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चांदोरी या गावातील द्राक्ष उत्पादक नितीन हिंगोले शेतकरी आहेत. नितीन हे पिढ्यानपिढ्या द्राक्षाची शेती करतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून सतत त्यांच्या द्राक्ष पिकाचे अवकाळीने पावसाने नुकसान होत आहे. यंदा थेट एक्सपोर्ट करण्यासाठी असलेला माल अवकाळीने पावसाने हिरावून नेला आहे. नितीन यांची द्राक्षे युरोपियन कंट्रीत निर्यात झाली असती, तर त्यांना प्रतिकिलो 60 ते 70 रुपये इतका भाव मिळाला असता. मात्र आता पावसाने हा माल अवघ्या 10 रुपये किलोने विकण्याची बिकट परिस्थिती त्यांच्यावर आली आहे. काल पालकमंत्री दादा भुसे यांनी त्यांच्या पिकाची पाहणी केली. पंचनामे करण्याचे आणि मदतीचे आश्वासन देखील दिले. मात्र सरकारकडून अवघी पाच ते सहा हजार हेक्टरी मदत मिळत असल्याने, शेतकऱ्यांची थट्टा सुरू असल्याची उद्विग्न भावना त्यांनी व्यक्त केली.
तशीच परिस्थिती राहूल हिंगोले यांची देखील आहे. गेल्या वर्षी देखील द्राक्ष पिकाचे नुकसान झाल्याने सरकारने पंचनामा करण्याचे आदेश दिले होते. मात्र गेल्यावर्षीची देखील मदत त्यांना अजून मिळाली नाही. शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेतले. मात्र हे कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न ते उपस्थित करतात. अशा स्थितीत सरकार जी अवघी तुटपुंजी मदत मिळते, ती मदत राहुल उद्विग्नपणे नाकारत आहे. आता फक्त आत्महत्या करण्याचा मार्ग आहे, अशी दुःखद भावना त्यांनी व्यक्त केली.
अवकाळी पावसाने या द्राक्ष मण्यांना तडे गेले आहे. द्राक्ष माल अक्षरश: सडला आहे. या मालाला व्यापारी देखील अवघे पाच ते दहा रुपये प्रतिकिलो भाव देतात. मग अशा स्थितीत उत्पादन खर्च देखील भरून निघत नाही. गेल्या दोन तीन वर्षांपासून सातत्याने अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे आता द्राक्ष शेतीच नाहीशी होईल की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.