सोलापूर : हंगामाच्या सुरवातीपासून (Grape) द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा निसर्गाच्या लहरीपणाशी कायम संघर्ष राहिलेला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होणार हे माहिती असतानाही केवळ अधिकचा दर आणि वर्षभर केलेल्या मेहनतीचे फळ मिळावे म्हणून शेतकऱ्यांनी औषध फवारणीला महत्व दिले. मात्र, याच (Pesticides) कीटकनाशकांच्या फवारणीमुळे (Pandharpur) पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष बागा ह्या जळाल्या आहेत तर अंतिम टप्प्यात असलेले द्राक्षाचे घड हे सुकले आहेत. आतापर्यंत निसर्गाचा धोका होता हे कमी म्हणून की काय क्लोरपारिफॉस घटक असलेल्या रासायनिक कीटकनाशकाची फवारणी केल्या नंतर द्राक्ष वेली जळणे, घड सुकणे एवढेच नाही तर काडी तडकणे असे प्रकार घडले आहेत. पंढपूर तालुक्यातील कासेगाव आणि तळणी शिवारातील 20 ते 25 एक्कर क्षेत्रातील बागांचे नुकसान यामुळे झाले आहे. आता द्राक्ष उत्पादक संघाने राज्य कृषीमंत्रि यांच्याकडे तक्रार केली असून यावर काय तोडगा काढला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
द्राक्ष बाग बहरवी तसेच अंतिम टप्प्यात असलेल्या द्राक्षाचे घड पूर्ण क्षमतेने भरावे यासाठी शेतकऱ्यांनी क्लोरपायरिफॉस हे घटक असलेल्या कीटनाशकाची फवारणी केली आहे. यामुळे मात्र, सात दिवसांमध्येच बागा जळून गेल्यासारखी होणे,द्राक्षाचे घड सुकणे, पाने पिवळी पडणे एवढेच नाही तर काडी फुगून तिला तडे गेले आहेत. त्यामुळे संपूर्ण बागांनाच धोका निर्माण झाला आहे. उत्पादन वाढीचे सोडा आता शेतकऱ्यांना बाग कशी जोपासावी हाच प्रश्न आहे. शिवाय संबंधित कीटकनाश कंपनीचे प्रतिनीधी विक्रेते हे झालेल्या नुकसानीबाबत कोणतीही दखल घेत नाहीत.
निसर्गाच्या लहरीपणामुळे अगोदरच द्राक्ष उत्पादक शेतकरी हा अडचणीत आहे. यातच चुकीच्या कीटकनाशकामुळे नुकसान म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूकच आहे. त्यामुळे अधिकच्या क्षेत्रावरील बागांचे नुकसान टाळण्यासाठी या कंपनीवर कारवाई करावी तसेच संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी द्राक्ष बागायदर संघाचे प्रशांत देशमुख यांनी थेट कृषिमंत्री यांनाच पत्रव्यवहार केला आहे. या किटकनाशकाचे नमुना तपासणीसाठी पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. याचे अहवाल येण्यास अजून कालावधी जाणार असून या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी आणि कंपनीवर कारवाई करण्याची मागणी पत्रात करण्यात आली आहे.
संपूर्ण हंगामात शेतकऱ्यांनी निसर्गाशी दोन हात करुन बागा जोपासल्या होत्या. पण कीटनाशकाचा असा काय परिणाम झाला आहे की चार दिवसांमध्येच होत्याचे नव्हते झाले आहे. द्राक्ष तोडणीला आले असतानाच हे संकट शेतकऱ्यांवर औढावले आहे. त्याचा थेट परिणाम आता उत्पादनावर होणार आहे. वर्षभर केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याची वेळ आली असतानाच शेतकऱ्यांना उघड्या डोळाने बागांचे होत असलेले नुकसान पहावे लागत आहे. एवढेच नाही तर आता जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोगेची पाहणी केली असून शेतकऱ्यांना आता मदतीची अपेक्षा आहे.
Summer Season: उन्हाळी सोयाबीनने शेतकऱ्यांचे पारणे फिटले, खरीप हंगामाचे टेन्शन मिटले
Untimely Rain: कोकणातही अवकाळीची अवकृपा, वादळी वाऱ्यामुळे आंबा गळती तर काजू बागांचे नुकसान