बीड : (Surplus Sugarcane) अतिरिक्त उसाचा प्रश्न किती गहन आहे याची प्रचिती बीड जिल्ह्यातील दोन घटनांवरुन समोर येऊ लागली आहे. अतिरिक्त उसाचे गाळप न झाल्यामुळे गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील तरुण शेतकऱ्याने आगोदर उसाच्या फडाला आग लावली व नंतर (Farmer Suicide) गळ्याला फास. तर दुसरीकडे याच अतिरिक्त उसाला कारखान्याची तोड मिळाल्याने मारफळा इथले शेतकरी बेभाण होऊन आनंदोत्सव साजरा करीत आहेत. दोन्ही शेतकऱ्यांचा प्रश्न एकच होता पण परिणाम काय याचे दर्शन सबंध राज्याला घडले आहे. या दोन्हीही घटना गेवराई तालुक्यातीलच असून यामध्ये रखडलेले (Sugarcane Sludge) उसाचे गाळप आणि कारखान्याची तोड फडात आल्यावर काय होते याचा प्रत्यय आला आहे.
राज्यात सर्वाधिक अतिरिक्त उसाचा प्रश्न मराठवाड्यात निर्माण झाला आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात तरी उसाची तोड होते की नाही या धास्तीने गेवराई तालुक्यातील नामदेव जाधव या 35 वर्षीय शेतकऱ्याने दीड एकरातील उसाचा फड पेटवून स्वत: गळपास घेऊन जीवन संपवले होते. वाढता कर्जाचा बोजा आणि ओढावलेल्या संकटातून सुटका करण्यासाठी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले तर दुसरी याच तालुक्यातील मारफळा इथले रविराज कुटे या शेतकऱ्याचा ऊस कारखान्याने नेला त्याचा आनंद गगणात मावेना झाला होता. याच आनंदाच्या भरात अख्ख्या गावाने ऊसभरणी केलेल्या ट्रॅक्टर समोर ढोल-ताश्याच्या गजरात ठेका धरला होता. त्यामुळे अतिरिक्त उसाने निर्माण केलेल्या दोन घटनांची चर्चा सध्या जिल्हाभर होत आहे.
चार दिवसापूर्वीच नामदेव जाधव या शेतकऱ्याने स्वतःचा ऊस पेटवून देऊन गळफास घेत आत्महत्या केली होती. दरम्यान गेवराई तालुक्यातील मारफळा इथले रविराज कुटे या शेतकऱ्याचा ऊस कारखान्याने नेला याच आनंदाच्या भरात शेतकरी कुटे यांनी गावातच ऊसाच्या ट्रॉलीची जंगी मिरवणूक काढत बँड बाजा आणि गाण्याच्या तालावर ठेका धरला. एका शेतकऱ्याने तर आनंदाच्या भरात चक्क साडी परिधान करून गाण्याच्या तालावर थिरकायला सुरुवात केली. त्यामुळे गावातील अनेक शेतकऱ्यांनी नृत्यावर ठेका धरला, गुलालाची उधळण बँड बाजा आणि गाण्यावर ताल धरत शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने उसाची पाठवणी केली आहे.
अतिरिक्त ऊसामुळे नामदेव जाधव यांनी आत्महत्या केल्यानंतर बीड जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी वडवणी तालुक्यातील एका शेतकऱ्याने वेळेत ऊसतोड झाली नाही म्हणून ऊसाचा फड पेटवून दिला होता. मे महिना अंतिम असतानाही हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. मराठावड्यातील बीड, जालना, लातूर, परभणी या जिल्ह्यामध्ये अतिरिक्त ऊस अजूनही फडातच आहे.