नंदुरबार : कापसाच्या दरामध्ये चढ-उतार होऊनदेखील अपेक्षित दर मिळत नाही तोपर्यंत विक्री नाही ही शेतकऱ्यांनी घेतलेली भूमिका अगदी रास्त ठरलेली आहे. कारण महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर (Record rate of cotton) कापसाला विक्रमी दर मिळाले आहेत. राज्यातील सर्वच खरेदी केंद्रावरील स्थिती बदलली असून (Nandurbar) नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमधील केंद्रावर तर 9 हजार 900 रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी दर मिळालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे स्वप्न सत्यामध्ये उतरले असून येथील (Cotton Procurement Centre) खरेदी केंद्रावर दिवसाकाठी 2 हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. आता बदलत्या दरामुळे आवकमध्ये वाढ होते का अजून शेतकऱ्यांना वाढीव दराची अपेक्षा आहे हे पहावे लागणार आहे.
गेल्या महिन्याभरापासून कापसाच्या दराबाबत शंका उपस्थित केली जात होती. एकीकडे बोंडअळीच्या प्रादुर्भावाने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होत तर दुसरीकडे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणीत घट झाली होती. त्यामुळे कापसाच्या दरावर त्याचा परिणाम झाला. मात्र, यंदा उत्पादनात मोठी घट झाल्याने कापसाच्या दराबाबत शेतकरी आशादायी होता. त्यामुळे विक्रीपेक्षा साठवणूकीवर भर देण्यात आला. अगदी सोयाबीनप्रमाणेच शेतकऱ्यांनी कापसाचीही साठणूक केली होती. आता दरात चांगली सुधारणा झालेली आहे. त्यामुळे पुन्हा खरेदी केंद्रावर वाहनांच्या रांगा लागणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणने आहे.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पळशी येथील कापूस खरेदी केंद्रात कापसाला विक्रमी 9 हजार 900 रुपये प्रति क्विंटल अशी ऐतिहासिक उंची गाठली. जिल्ह्यात कापसाला ९ हजार ९०० पेक्षा अधिक दर मिळण्याची ही पहिली वेळ आहे. यामुळे बाजार समितीमध्ये कापसाची आवक वाढली असून रोज 2 हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. नंदुरबार बाजार समितीत चांगला दर मिळत आसल्याने धुळे जिल्ह्यासह गुजरात आणि मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागातील शेतकरी कापूस विक्री साठी आणत असल्याचे चित्र आहे. आता मिळत आसलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत असल्याचे बाजार समितीचे सभापती योगेश अमृतकर यांनी सांगितलेले आहे.
फरदड कापसावर बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव आणि शेतजमिनीचे होत असलेले नुकसान यामुळे शेतकऱ्यांनी फरदड कापसाचे उत्पादन न घेण्याचे ठरवले होते. मात्र, आता कापसाला विक्रमी दर मिळू लागल्याने फरदडची काढणी करावी की हे पिक वावरातच ठेवावे याबाबत शेतकऱ्यांच्या मनात द्विधा मनस्थिती होत आहे. आता फरदड कापसाची मोडणी करुन पुन्हा रब्बी हंगामातील पेरणी करण्यापेक्षा आहे तेच पिक शेतामध्ये ठेऊन उत्पादन घेण्याचा मानस शेतकऱ्यांचा आहे. पण फरदड कापसामुळे शेत जमिनीचा दर्जा कमी होणार आहे. शिवाय वाढत्या बोंडअळीचा परिणाम इतर पिकांवरही होणार असल्याने फरदडची काढणी करण्याचा सल्ला कृषितज्ञ देत आहेत.