नांदेड : (Kharif Season) हंगामाच्या सुरवातीपासूनच यंदा खरिपाला ग्रहन लागले होते. सुरवातीला अतिवृष्टीमुळे प्रमुख पीक असलेले (Soybean Rate) सोयाबीन तब्बल महिनाभर पाण्यातच होते. शेंगा पोसल्याने जाग्यावर या पिकाची पुन्हा उगवण होऊ लागली होती. त्यामुळे उत्पादनात तर घटच झालीच पण पावसामुळे सोयाबीनचा दर्जाही ढासाळला आहे. त्यामुळे दर पडले आहेत. आता सर्वकाही (Toor Crop) तूर पिकावर अवलंबून असताना अवकाळी पाऊस व त्यानंतर निर्माण झालेले ढगाळ वातावरण यामुळे शेंगा पोसण्याच्या अवस्थेत मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने नुकसान झाले आहे. त्यामुळे आता तुर तर उभा आहे पण शेंगा नसून ‘तुराट्या’ म्हणून अशीच काहीशी स्थिती मराठवाड्यातील खरीप हंगामातील शेवटच्या पिकाची झालेली आहे.
खरिपात केवळ उडदाचे पिक शेतकऱ्यांच्या हाती लागले आहे. मात्र, मराठवाड्यात उडदाचे क्षेत्र हे कमी असल्याने त्याचा एवढा फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही. शिवाय बाजारात आवक सुरु झाल्यापासून 7 हजारच्या दरम्यान उडदाला दर कायम आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. उत्पादनात तर घट झालेलीच आहे पण जे पदरी पडले त्याला योग्य दरही मिळत नाही. शिवाय सरकारच्या धोरणांमुळे दरात कायम घसरण होती ती वेगळीच. त्यामुळे सर्वकाही तुरीवर अवलंबून होते. आता काढणी 10 दिवसांवर येऊन ठेपललेली असतानाच मर रोगाचा एवढा प्रादुर्भाव झाला आहे की, शेंगा पोसल्याच गेल्या नाहीत. त्यामुळे काढणीवर होणारा खर्चही पदरी पडतो की नाही अशी अवस्था असल्याचे शेतकरी अमोल तांदळे यांनी सांगितले आहे.
मर रोग हा बुरशीजन्य रोग आहे. यामुळे तुरीच्या खोडावर ठिपके, भेगा पडून झाडाच्या मुळाकडे अन्नद्रव्याचा पुरवठाच होऊ दिला जात नाही. त्यामुळे तुर ही मुळापासूनच वाळायला सुरवात होते. दरवर्षी अंतिम टप्प्यात पिक असताना या मर रोगाचा प्रादुर्भाव हा ठरलेलाच आहे. त्यामुळे वर्षभर केलेली मेहनतही वाया जाते आणि अपेक्षित उत्पादनही मिळत नाही. वातावरणातील बदलाचा हा परिणाम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फुलोऱ्यात असलेल्या तुरीला प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मेटॅलॅक्झिल अधिक मॅन्कोझेब हे संयुक्त बुरशीनाशक प्रति 1 लिटर पाण्यात 1 ग्रॅम याप्रमाणे मिसळून फवारणे गरजेचे आहे. शिवाय वातावरण स्वच्छ असतानाच याची फवारणी फायदेशीर राहणार आहे.
खरीप हंगाम बहरात असताना सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम तूर वगळता इतर पिकांवर मोठ्या प्रमाणात झाला होता. मात्र, या अतिवृष्टीनंतर तुरीचे पीक हे शेंगांनी लगडले होते. त्यानंतरही शेतरऱ्यांनी बुरशीनाशकाच्या फवारण्या केल्या. आता शेंगापोसून तूर काढणीची तयारी सुरु असतनाच झालेल्या अवकाळी पावसामुळे व वातावरणातील बदलामुळे हे पीक जागीच वाळत आहे. ऐन काढणीच्या प्रसंगीच मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे आता काढणीही परवडणार नाही. 50 टक्केपेक्षा अधिकचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थिती तरतुदीनुसार विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यांवर 25 टक्के रक्कम अदा करण्याची मागणी केली जात आहे.