वाशिम : जुन्या काळातील उत्तम शेतीच्या व्याख्येत आज आमुलाग्र बदल झाला. त्याची जागा उत्तम नोकरीने घेतली आहे. शिक्षणपूर्ण केलेल्या कुठल्याही व्यक्तीचा शेतीत राबण्याकडे कल राहिला नसल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. मात्र आपली नोकरी संभाळून मिळणाऱ्या फावल्या वेळात आपल्या वडिलोपार्जित शेतीत नंदनवन फुलविण्याची किमया एका शेतीनिष्ठ आदर्श शिक्षकाने करून दाखविली आहे. आपला शिक्षकी पेशा समर्थपणे सांभाळून काळ्या आईसोबतचे ऋणानुबंधही तितक्याच तत्परतेने या शिक्षकाने जपले. वाशिम जिल्ह्यातील तांदळी सवई गावातील एका आदर्श शिक्षकाने आपल्या शेतीत नंदनवन फुलविले आहे. वर्षातून तब्बल चारवेळा येणाऱ्या आंब्यासोबतच बदाम, फणस, सफरचंद अशा नाना प्रकारच्या फळांचे उत्पादन घेतले. या शिक्षकाने शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
साडेतीन एकर शेतातील या वेगवेगळ्या पिकामधून मधून 3 लाख खर्च केले. तो खर्च वगळता 7 लाख रुपयांचा निवळ नफा मिळत आहे. हा शेतकऱ्यांकरिता कुतुहलाचा विषय ठरलेला हा प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी याठिकाणी येत आहेत.
कोरडवाहू पिकांचा जिल्हा म्हणून वाशिम जिल्ह्याची ओळख आहे. वाशिम जिल्ह्यातील तांदळी शेवई येथील गजानन भालेराव या शिक्षकाने आपल्या शेतात पाण्याची सोय केली. वर्षातून चार वेळा येणारे आंबे, बारमाही येणारे पेरू, बदाम, फणस, सफरचंद यासारख्या फळांसोबतच शेवगा, लिंबू, काकडी आणि अनेक भाजीवर्गीय पिके एकाच ठिकाणी घेतली आहेत.
या सर्व पिकांची त्यांनी घन पद्धतीने लागवड केली आहे. बदलत्या हवामानाचा विपरीत परिणाम या पिकांवर होऊ नये म्हणून गजानन भालेराव यांनी आपल्या शेतात शेडनेटची उभारणी केली आहे.
या ठिकाणी सर्व पिकांना कुठल्याही रासायनिक खतांचा वापर केला जात नाही. केवळ सेंद्रीय पद्धतीने उत्पादन घेण्यात येते. त्यामुळे फळे, भाज्यांचा दर्जा आणि उत्पादन दर्जेदार मिळत असल्याचे गजानन भालेराव सांगतात. त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील अनेक शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देतात.
आलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना गजानन भालेराव यांच्याकडून मार्गदर्शन घेतात. सोबतच पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक शेतीकडे वळण्याचा सल्ला देण्यात येतो. असं सरपंच पांडुरंग भालेवार यांनी सांगितलं.