नांदेड : धरणी मातेनं भरभरुन दिलं तर शेतकरी काय करु शकतो याची अनेक उदाहरणे यापूर्वीही समोर आली आहेत. ज्या (Banana Product) केळी उत्पादनातून घरात लक्ष्मी आली त्याच्या ऋणाईत (Ardhapur Farmer) अर्धापूरच्या शेतकऱ्यांने केलेल्या उपक्रमाची चर्चा आता सबंध नांदेडाच होत आहे. या शेतकऱ्याने घरात संपूर्ण केळी बागेची प्रतिकृती तयार केलीय. मखर ते संपूर्ण देखावा हा केळीच्या पानापासून बनविण्यात आले असून जणू काही गौराई केळीच्या बागेतच विराजमान झाल्याचं दिसून येत आहे. शिवाय यासाठी कुठे प्लॅस्टिकाच वापर केलेला नाही. अर्धापूर तालुक्यातील पारडी येथील (Farmer) शेतकऱ्याने ही भन्नाट कल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. केळी उत्पन्नामुळे पाटलांच्या घरात आर्थिक गोडवा निर्माण झाला त्यामुळे पाटलांनी हा नाद केला. पण बघ्यांची गर्दी आणि वेगळेपणामुळे त्यांचा नादही वाया नाही गेला.
यंदा आखाती देशात केळी निर्यात झाल्याने केळीचा भाव प्रचंड वधारला होता. अगदी उच्च दर्जाची केळीला प्रति क्विंटल तीन हजार रूपयापर्यंतचा भाव मिळाला, त्यातून अर्धापुर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी चांगलेच सुखावले आहेत. गौराईला मराठवाड्यासह विदर्भात महालक्ष्मी म्हणून ओळखल्या जाते, यंदा केळीने बक्कळ पैसा आल्याने महालक्ष्मीची कृपा झालीय असा दृढ विश्वास भांगे कुटुंबाचा आहे. त्यामुळेच महालक्ष्मीच्या सजावटीसाठी केळीच्या बागेचा देखावा या शेतकरी कुटुंबाने तयार केलाय.
प्लॅस्टिक बंदी ही नावालाच असून काळाच्या ओघात याचा वापर वाढत आहे. पण दिगंबर पाटील यांनी प्लॅस्टिकचा वापर टाळला आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो म्हणून पर्यावरण पूरक देखावा आकर्षणाचे केंद्र बनलंय. यंदा निसर्गाच्या लहरीपणात शेतकरी सापडला आहे. असे असताना केळी उत्पादकांना वाढीव दरामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र, सर्वकाही मनासारखे झाले तर शेतकरी काय करु शकतो हे दाखवून दिले आहे.
राज्यातून देशभर आणि विदेशात केळी निर्यात होते, त्यात नांदेडच्या अर्धापुरच्या केळीचा वाटा मोठा आहे. अर्धापुरची केळी रंग रुपाला देखणी असून चवीला प्रचंड गोड असते. त्यासोबतच इतर वाणाच्या तुलनेत अर्धापुरची केळी जास्त दिवस टिकते. त्यामुळे व्यापाऱ्यांची अर्धापुरच्या केळीला मोठी मागणी असते. यंदा तर आग्रा, दिल्ली आणि हैद्राबादच्या व्यापाऱ्यानी नांदेडमध्ये येऊन केळीची खरेदी केली. त्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न झाले असून त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी चांगलाच सुखावलाय.