अहमदनगर : तंत्रज्ञानाच्या माध्यमातून (Farm Production) शेती उत्पादनात वाढ होत आहे तर दुसरीकडे संशोधनामुळे याच शेती व्यवसायाचा मुख्य जोडव्यवसाय असलेल्या (Animal husbandry) पशूपालनाला देखील चालना मिळत आहे. संशोधनामुळे पशूपालन अगदी सोयीचे झाले आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रच्या वतीने (Embryo transplant) भ्रूण प्रत्यारोपणाचा वापर करुन जर्सी गायीच्या पोटी गीर कालवडीचा जन्म घडवून आणण्यात आला आहे. कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन विभागाच्या माध्यमातून ही किमया घडलेली आहे. तंत्रज्ञानाच्या वापराने पहिल्यांदाच असा प्रयोग घडवूण आणण्यामध्ये यश मिळाले आहे. त्यामुळे भविष्यात गीर कालवडीची संख्या देखील वाढेल असा विश्वास विद्यापीठाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने देशी गाय संशोधनच्या माध्यमातून विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर किंवा शेतकऱ्यांच्या गोठ्यात भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान वापराला सुरवात केली आहे. याच माध्यमातून पहिला प्रयोग करण्यात आला असून तो यशस्वी देखील झाला आहे. यातून झालेल्या गीर कालवडीचे वजन हे 22.1 किलो आहे जर्सी गायीच्या दुधाचे फॅट हे 5 टक्के आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 150 पेक्षा जास्त साहिवाल, गीर, राठी, थारपारकर व लाल सिंधी जातीच्या वासरांना जन्म होणार आहे.
भ्रूण प्रत्यारोपण हे तंत्रज्ञान विकसीत करण्यात आले आहे. चांगली अनुवंशिकता असलेल्या दाता गाईपासून कृत्रिमरित्या आणि तेही स्त्रीबीज मिळवून त्याचे प्रयोगशाळेत चांगली अनुवंशिकता असलेल्या वळूच्या वीर्यासोबत फलन करणे व तयार झालेले फलित अंडाची सात दिवस वाढ करुन त्यापासून तयार झालेले भ्रूण हे कमी गुणवत्ता क्षमता असलेल्या प्राप्तकर्ता गायीमध्ये प्रस्थापित करुन त्याची वाढ केली जाते. त्यापासून चांगल्या आणि गोंडस वासराचा जन्म होतो.
देशात देशी गायींची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान हे प्रभावी राहणार आहे. आतापर्यंत हे तंत्रज्ञान केवळ कृषी विद्यापीठापर्यंतच मर्यादित असून पुढील काळात ते शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले जाणार आहे. त्यामुळे देशी गायींची संख्या देखील वाढणार आहे. भविष्यात उच्च दर्जाची आणि वेगाने गायी तयार करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी सांगितले आहे.