सुमित सरनाईक, TV9 मराठी, मुंबई : दिवाळीला (Diwali Festival) अवघे काही दिवस बाकी राहिलेत. अशातच दूध (Milk Rates) उत्पादकांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. गोळुळ दूध (Gokul Milk News) संघाने दूध उत्पादकांना दिवाळी भेट दिलीय. म्हशीच्या आणि गाईच्या दूध खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे. तसंच म्हशीच्या दूध विक्री दरातही वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारपासून नव्या दूध दरवाढीची अंमलबजावणी केली जाईल.
नव्या दरांप्रमाणे आता म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर 2 रुपये वाढ करण्यात आली आहे. तर गाईच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
दरवाढीनंतर आता म्हशीला प्रति लिटर 47.50 पैसे तर गाईला प्रति लिटर 35 रुपये दर मिळणार आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांरी आनंद व्यक्त केला आहे. गेल्या दीड वर्षात 9 रुपयांची दूध दरवाढ नोंदवण्यात आली आहे. आतापर्यंत सहा वेळा दूध खरेदी-विक्री दरात वाढ करण्यात आली आहे.
दुसरीकडे म्हशीच्या दूध विक्री दरातही 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आधी म्हशीच्या एक लिटर दुधाचा दर कोल्हापूरमध्ये 60 रुपये होता. तो आता 63 रुपये इतका झाला आहे. तर अर्धा लिटर म्हशीच्या दुधाची किंमत 30 रुपयांवरुन 32 रुपये इतकी झाली आहे.
मुंबई, पुण्यात एक लिटर म्हशीच्या दुधाची किंमत 66 रुपयांवरुन आता 69 रुपये झाली आहे. तर अर्धा लिटर म्हशीच्या दुधाची किंमत 33 रुपयांवर 35 रुपये इतकी झाली आहे.
6.0 फॅट आणि 9.0 एसएनएफ प्रतिलिटर 45.50 पैसे इतका खरेदी दर म्हशीच्या दुधाला आधी मिळत होता. तो आता 47.50 झाला असून गायीच्या दूधाचा खरेदी दर 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ प्रतिलीटर 32 वरुन 35 रुपये इतका झाला आहे. 21 ऑक्टोबरपासून हे नवे दर लागू केले जाणार आहेत.