मुंबई : देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना ज्या (PM kisan Yojna) पीएम किसान योजनेच्या 11 व्या हप्त्याची प्रतिक्षा लागून राहिली होती ती मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी संपली आहे. (Indian Farmer) देशातील 10 कोटी 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 21 हजार कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. मोदी सरकारला 8 वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने शिमला येथील आयोजित कार्यक्रमात औपचारिकरित्या (PM Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम अदा केली आहे. पुढील दोन दिवसामध्ये प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे. पीएम किसान योजनेला डिसेंबर 2018 मध्ये सुरवात झाली होती. त्यानंतर प्रत्येक वर्षी केंद्र सरकारने वर्षाकाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये जमा केले आहेत.
पीएम किसान योजनेचा 11 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला असला तरी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर तो जमा झाला असेलच असे नाही. याकरिता दोन दिवसाचा कालावधी लागणार आहे. मात्र, पैसे खात्यावर जमा झाले की नाही हे पाहण्यााठी सर्व प्रथम https://pmkisan.gov.in/ या केंद्राच्य अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. यामध्ये ‘Beneficiary Status’ वर क्लिक करावे लागणार आहे. यानंतर मात्र तुमचा आधारकार्ड क्रमांक टाकावा लागणार आहे.
पीएम किसान योजनेमध्ये बदल करण्यात आला आहे. योजनेतील अनियमितता लक्षात येताच यामधील नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.देशभरातील तब्बल 54 लाख शेतकऱ्यांनी पात्र नसतानाही योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे सरकारचे तब्बल 4 हजार 300 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या संबंधित नागरिकांना नोटीस पाठवून ही रक्कम वसुल केली जाणार आहे. शिवाय आता अशा प्रकारे निधीचा लाभ कुणाला घेता येऊ नये म्हणून 30 जुलै पर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. डॉक्टर, इंजिनीअर यांनी अर्ज करुनही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. शिवाय लोकसभा, राज्यसभा सदस्य, मंत्री, माजी मंत्री, महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्ष यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यांना शेती असली तरी त्याचा फायदा होणार नाही. राज्य किंवा केंद्र सरकारचे अधिकारी यांना देखील योजनेचा लाभ मिळणार नाही.
ज्यांनी 11 व्या हप्त्यासाठी मार्च किंवा एप्रिलमध्ये अर्ज केल आहे अशा लाभार्थ्यांना देखील योजनेचा लाभ होणार आहे. त्यासाठी तुम्ही कागपत्रांचा पूर्तता कऱणे गरजेचे आहे. यारकिता आधार क्रमांक, बॅंक खाते क्रमांक, महसूल विभागाला नोंद, मोबाईल क्रमांक हे सर्व अचूक असणे गरजेचे आहे. शिवाय हे सर्व असतानाही जर पैसे जमा झाले नसतील तर मात्र, शेतकरी हे कृषी अधिकारी किंवा लेखापाल यांना विचारणा करु शकतात. येथूनही तुम्हाला प्रतिसाद मिळाला नाहीतर मग 155261 किंवा 011-24300606 या क्रमांकावर संपर्क करावा लागणार आहे. त्यामुळे आज जरी अर्ज केला तरी जुलैपर्यंत हा हप्ता मिळू शकणार आहे.