मुक्ताईनगर : मुक्ताईनगर (muktainagar) तालुक्यात एकूण २३ हजारपेक्षा अधिक पीएम किसान सन्मान निधी (PM-Kisan Samman Nidhi) योजनेचे लाभार्थी आहेत. त्यापैकी सुमारे ३,६५२ शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप झालेली नाही. त्याचबरोबर १७२६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांसोबत आधार लिंक झालेले नाही. त्यामुळे लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांची ई-केवायसी (e-kyc) या योजनेत अनेक बोगस लाभार्थी लाभ घेत असल्याचं उघडकीस आलं आहे. त्याबरोबर खरे शेतकरी या योजनेपासून वंचित राहत आहेत. ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नाही. त्यांची ई-केवायसी करण्याचं काम तालुका कृषी अधिकारी माळी यांना देण्यात आली आहे. कृषी अधिकारी सध्या त्या कामाला जोरात लागले आहेत. कृषी कर्मचाऱ्यांना गावागावात ई-केवायसी करून घ्यायची आहे.
पीएम किसान योजनेचा फायदा खऱ्या शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी शासनाच्यावतीने ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांची केवायसी झाली असेल त्याचं शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे हप्ते नियमित मिळणार आहेत.
बँक खात्यासोबत आधार लिंक सुद्धा आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पीएम किसानसाठी नोंदणी करताना जो बँक खाते क्रमांक दिला आहे. त्या खात्यांसोबत बँकेत जाऊन आधार लिंक करणे आवश्यक आहे. पीएम किसान योजनेचे काम आता कृषी विभागाला देण्यात आले आहे. पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. दुष्काळ सदृश परिस्थितीत पीएम किसानचा निधी शेतकऱ्यांना साहाय्यभूत ठरेल. शेतकऱ्यानी ई-केवायसी आणि आधार लिंक न केल्यास हप्ता मिळणार नाही. महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांची ईकेवायसी करायची अजून बाकी आहे.