नवी दिल्ली | 21 सप्टेंबर 2023 : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या पीएम किसान योजनेत आता शेतकऱ्यांना एक गिफ्ट मिळणार आहे. केंद्र सरकारने गरीब आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून पीएम किसान योजना साल 2019 पासून सुरु केली आहे. या मोहिमेद्वारे वर्षांतून सहा हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केली जाते. या योजनेचा पंधरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. आता या योजनेतून शेतकऱ्यांना आणखीन एक गिफ्ट मिळणार आहे.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी किसान ऋृण पोर्टल लॉंच केले आहे. या पोर्टलद्वारे शेतकरी सहजपणे किसान क्रेडीट कार्डसाठी अर्ज करु शकणार आहेत. याद्वारे शेतकऱ्यांना सबसिडी सह कर्ज सुविधा देखील मिळणार आहे. शेतकऱ्यांना कमी व्याजात कर्ज देण्यासाठी हे पोर्टल तयार केले आहे. शेतकरी शेतीसाठी सावकारांकडून कर्ज घेतात. त्याचे व्याज जादा असते. पीएम किसान लाभार्थ्यांनाही किसान क्रेडीट कार्डचा लाभ मिळणार आहे.
1 ऑक्टोबर 2023 पासून केंद्र सरकार घर-घर किसान क्रेडीट कार्ड मोहिम सुरु करणार आहे. यावर्षअखेरपर्यंत ही मोहीम चालणार आहे. ही मोहिम डीजिटल देखील सुरु राहणार आहे. बॅंका, पंचायती आणि जिल्हा प्रशासनाला देखील या योजनेत सहभागी केले आहे. पीएम किसानच्या लाभार्थ्यांनाही येत्या तीन महिन्यात किसान क्रेडीट कार्ड मिळणार आहे.
सरकारने साल 1998 मध्ये किसान क्रेडीट कार्डची सुरुवात केली होती. यात शेतकऱ्यांना चार टक्के दराने कर्ज दिले जाते. इतरांहून हे कर्ज खूपच स्वस्त आहे. या कार्डासाठी देशातील सर्व शेतकरी पात्र आहेत. ही योजना भारत सरकार, भारतीय रिझर्व्ह बॅंक ( RBI ) आणि नाबार्डने मिळुन सुरु केली आहे.
देशातील शेतकरी पीएम किसानचा 15 वा हप्ता कधी मिळणार याची वाट पाहात आहेत. या योजनेत वर्षाला सहा हजार रुपये मिळतात. दोन हजार रुपयांच्या हप्त्यात ही रक्कम वर्षांतून तीन वेळा मिळते. मिडीया रिपोर्टनूसार शेतकऱ्यांना 15 वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात मिळू शकतो. शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम थेट जमा होणार आहे.