नाशिक : अडचणीत असलेल्या (Grape Production) द्राक्ष उत्पादकांना दिलासा देण्याच्या अनुशंगाने (Grape Growers Association) द्राक्ष बागायतदार संघाने उत्पादक, व्यापारी यांची वज्रमूठ करीत उत्पादनावर झालेला खर्च आणि त्या तुलनेत किमान 10 टक्के नफा या तत्वावर महिन्यानुसार दर निश्चित केले होते. पण निर्णयानंतर अवघ्या दिवसांमध्येच याची पायमल्ली होत असल्याचे चित्र नाशिक जिल्ह्यात पाहवयास मिळत आहे. गतआठवड्यातच (Export) निर्यातदार हे ठरवून दिलेल्या दरापेक्षा कमी किमतीने शेतकऱ्यांकडून खरेदी करीत असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. तर आता निर्यातदारांनी थेट द्राक्ष काढणीच ठप्प केल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत. आतापर्यंत निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागला होता आता दरामुळे उत्पादकांची कोंडी सुरु आहे. त्यामुळे बागायतदार संघाने घेतलेले निर्णय आता निर्यातदारांना मान्य नाहीत तर यापेक्षा कमी दराने विक्री ही उत्पादकांना परवडत नाही त्यामुळे नेमका काय तोडगा निघणार हे पहावे लागणार आहे.
नाशिक जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, दरवर्षी निसर्गाचा लहरीपणा, होणारा खर्च आणि त्या तुलनेत बाजारातील दर यामुळे उत्पादकांचे नुकसानच होत होते. त्यामुळे यंदा जानेवारी महिन्यासाठी 85 रुपये किलो असा दर ठरविण्यात आला होता. पण हा दर निर्यातीसाठी परवडत नाही म्हणून निर्यातदारांनी कमी दराने खरेदीस सुरवात केली होती. याबाबत बागायतदार संघाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर गतआठवड्यात झालेल्या बैठकीत 82 रुपये किलोचाच निर्णय कायम ठेवण्यात आला होता. पण निर्यातदारांनी त्यापुढचे पाऊल उचलत आता थेट द्राक्ष काढणीच बंद केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे तर नुकसान होतच आहे पण प्रतिक्षा आहे की, यावर काय तोडगा निघणार याची.
जानेवारी महिन्यासाठी 82 रुपये किलो असा दर ठरवण्यात आला आहे. पण रशियामध्ये निर्यात करण्यासाठी निर्यातदारांकडून थेट 45 रुपये किलोनेच मागणी होत आहे. रशियाच्या मार्केटींगसाठी द्राक्ष बागायतदार संघाने ठरवून दिलेला दर परवडत नसल्याचे म्हणणे आहे. त्यामुळे काही भागातील काढणीच बंद झाली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात कमी दराने द्राक्षांची विक्री करावी लागली तर आता काढणीच बंद आहे. दुसरीकडे दर्जाहीन द्राक्ष स्थानिक बाजारपेठेत विक्री करण्याची नामुष्की ओढावली आहे.
नैसर्गिक संकटाचा सामना करीत अखेर द्राक्ष उत्पादकांच्या पदरी पडलेले आहेत. पण आता काढणी सुरु असतानाच एक ना अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. विशेषत: रशियामध्ये निर्यात होणाऱ्या द्राक्षाबाबत अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून सुरू असेलेल्या या गोंधळाचा द्राक्षाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. द्राक्षांची गुणवत्ता कमी झाल्याचे सांगत निर्यातदार आणखी दर पाडत आहेत. दरम्यान, रशिया वगळता युरोपसाठी निर्यात होणाऱ्या द्राक्षांना ८० ते ८५ रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे उत्पादकांच्या हीताचाच निर्णय घेतला जाणार असल्याचे बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी सांगितले.
फुल शेतीतून शेतकऱ्याच्या जीवनात दरवळेल उत्पन्नाचा सुगंध, जाणून घ्या लागवडीची योग्य पध्दत..!
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी: घोटाळेबाजांना आळा घालण्यासाठी पीएम किसान योजनेत काय झाला बदल?