नाशिक : द्राक्षपंढरी म्हणून नाशिकची ओळख संपूर्ण जगभरात आहे. नाशिकच्या द्राक्षांची गोडी जगभरात जाऊन पोहचली आहे. मात्र जवळपास दोन-तीन वर्षानंतर नाशिकच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार आहे. कोरोना काळात द्राक्षाला मागणी नव्हती, त्यानंतर बेमोसमी पावसाने सलग दोन वर्षे द्राक्ष पीक हातातून गेले होते. त्यामुळे सलग तीन वर्षे नुकसान झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. मात्र यंदाच्या वर्षी नुकसान कमी झाल्याने द्राक्ष पीक चांगल्या स्थितीत आहे. यंदाच्या वर्षी थंडीचाही काही फारसा फटका बसलेला नाही. द्राक्षाची लागवडही यंदाच्या वर्षी अधिक होती, त्यामुळे उत्पादनात वाढ होणार हे निश्चित होते. विशेष म्हणजे युरोपियन राष्ट्र असलेल्या देशात 197 मेट्रिक टन निर्यात अवघ्या दहा दिवसांत झाली आहे. याशिवाय इतर देशात देखील द्राक्षाची निर्यात होऊ लागली आहे.
संपूर्ण जगात द्राक्षामध्ये महाराष्ट्र एक नंबरला आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक द्राक्ष निर्यात केला जातो, त्यामुळे द्राक्ष पंढरी म्हणून संपूर्ण जगभरात नाशिकची ओळख आहे.
नाशिक जिल्ह्यात जवळपास 63 हजर हेक्टर द्राक्षाची लागवत स्थित आहे. त्यामध्ये निफाड, दिंडोरी आणि नाशिक तालुका द्राक्षपीक घेण्यात अव्वल आहे.
राज्यातील द्राक्ष पीकाच्या 100 टक्यांपैकी 91 टक्के द्राक्ष पीक एकट्या नाशिकमध्ये घेतले जाते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात परदेशी व्यापारी नाशिकमध्ये येत असतात.
युरोपमधील नेदरलँड, जर्मनी, बेल्जीयम, युके आणि डेन्मार्क येथे मोठ्या प्रमाणात द्राक्ष नाशिकमधून पाठविला जातो. तर रशिया, युएई, कॅनडा, तर्की आणि चीन या देशांमध्ये द्राक्षाची निर्यात होते.
यंदाच्या वर्षी अधिकची लागवड, उच्च प्रतीचा द्राक्ष आणि त्यानंतर खुली असलेली बाजारपेठ बघता विक्रमी निर्यात होणार असून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.