परभणी : (Summer Crop) उन्हाळी भुईमूगाची काढणी कामे जोमात सुरु आहेत. मराठवाड्यात (Groundnut) भुईमूगाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, शेंगदाण्याप्रमाणेच शेंगालाही (Parbhani Market) मार्केट मिळणे गरजेचे होते. त्यानुसार परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाहिर लिलावाच्या माध्यमातून भुईमूगांच्या शेंगाची खरेदीला सुरवात झाली आहे. सोमवारपासून या अनोख्या उपक्रमाला सुरवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळेल आणि ग्राहकांनाही आता वणवण न फिरता थेट मार्केटमध्ये जाऊन शेंगाची खरेदी करता येणार आहे. शेतकऱ्यांनी भुईमूग विक्रीसाठी आणण्याचे आवाहन बाजार समितीचे सभापती समशेर वरपुडकर यांनी केले आहे.
परभणी बाजारसमितीच्या कार्यक्षेत्रात यंदा मोठ्या प्रमाणात भुईमूगाची लागवड झाली आहे. शिवाय पोषक वातावरणामुळे हे उन्हाळी पीकही बहरात होते. अंतिम टप्प्यात मात्र, वाढत्या उन्हामुळे शेंगा पोसल्या नसल्या तरी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. मार्केट यार्डावर जाहीर लिलावाद्वारे भुईमूग शेंगाची खरेदी करण्याची व्यापाऱ्यांची इच्छा होती. त्यानुसार आडत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मोतीलाल जैन यांनी याबाबत बाजार समिती प्रशासनाला माहिती दिली. त्यानुसार सोमवारपासून लिलावास सुरवात झाली आहे.
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला अधिकाअधिक दर मिळावा हाच बाजार समित्यांचा उद्देश आहे. त्यानुसार हा अभिनव उपक्रम असून याला देखील शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळणार आहे. शिवाय यंदा परभणी जिल्ह्यात लागवड क्षेत्र वाढले असल्याने शेतकऱ्यांनाही चांगले मार्केट मिळालंय. सोमवारपासून जाहिर लिलावात भुईमूगाच्या शेंगाची खरेदी होणार असून शेतकऱ्यांनी स्वच्छ शेंगा बाजारात आणल्या तर त्यानुसार चांगला दर मिळणार आहे. सोमवार हा सौद्यांचा पहिला दिवस असल्याने आवक कमी झाली पण शेंगाला समाधानकारक दर मिळाला आहे.
सबंध हंगामात उन्हाळी पिकांसाठी पोषक वातावरण राहिले असले तरी अंतिम टप्प्यात वाढत्या उन्हामुळे पिकांवर परिणाम झाला आहे. भुईमूगाच्या शेंगा तर पोसल्याच गेल्या नाहीत. त्यामुळे मार्केटमध्ये शेंगा दाखल करण्यापूर्वी त्या स्वच्छ धुऊन आणणे गरजेचे आहे. लिलावाच्या पहिल्याच दिवशी कमी आवक झाली असली तरी भुईमूगाच्या शेंगाला सरासरी एवढा दर मिळाला आहे. मात्र, पुढच्या वर्षीदेखील मार्केट यार्डात हळद या शेतीमालची खरेदी विक्रीचा व्यवहार करण्याचा मानस आहे.