महाराष्ट्र : बदलत्या हवामानाचा व वाढत्या तापमानाचा फटका हापूस आंब्याला (Mangoes) बसत आहे. तापमान वाढीमुळे झालेल्या उष्माघाताचा फटका आंब्याला बसल्याने बहुतांश ठिकाणी आंब्यावर डाग उठल्याने आंबे खराब होऊन गळू लागले आहेत. काही ठिकाणी उष्माघातामुळे फळ पिवळे पडत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबे गळून पडत आहेत. बागायतदारांचे आर्थिक गणित विस्कटले असल्याने बागायतदार चिंतातूर झाले आहेत. वाढता उष्मा, अवकाळी पाऊस, वातावरणातील बदलाने (climate change) लांबलेला पावसाळा आणि उशिराने सुरू झालेली थंडी यामुळे हापूस काहीसा उशिराने मोहरला आहे. त्यानंतरही या मोहरावर थ्रीप्स रोगामुळे आणि तुडतुडा या रोगाचा प्रादुर्भाव वाढला. परिणामी मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागली. अशा परिस्थितीमध्ये काही प्रमाणात हापूस हाताशी लागेल, अशी आशा बागायतदारांची होती. पण सध्या वातावरणात उष्मा वाढला असून त्याचा परिणाम आता हापूसवर (hapus) जाणवत आहे. झालेल्या फळधारणापैकी जवळपास ७५ टक्के हापूस हा गळून पडत आहे. आता उरला सुरला हापूसही हातातून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बागायतदारांचा यंदाचा हंगाम आर्थिक कसरतीचा ठरण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याचा अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. खरिपातील पीक हातातून गेल्यानंतर शेतकऱ्यांना रब्बी पिकाची मोठी आशा होती. परंतु गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने गहू, हरभरा हे पीक हातून निघून गेले. तर आता झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा, मका, ज्वारी, गहू यासह फळ पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
सोयगाव तालुक्यातील जंगल तांडा या गावाला सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास वादळाचा तडाका बसून गावातील विजेचे लोखंडी पोल हे अर्ध्याहून पूर्ण वाकून गेले. तसेच काही घरावरील आणि शेतातील शेड वरील पत्रे देखील उडाले. तर कन्नड तालुक्यात देखील तशीच परिस्थिती आहे. शेतकऱ्यांचे पहिल्या पावसाने उरले सुरले पीक देखील जमीनदोस्त झाले आहे. शिरसाळा येथील एका युवकाचा वीज पडून मृत्यू देखील झाला.