वाशिम : मागील चार दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत आहे. तसेच शनिवारी आणि शुक्रवारी जिल्ह्यात गारपिटीनं प्रचंड थैमान घातलं. त्यामुळं रब्बी गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला पिकांसह निंबू, डाळिंब बागांचं अतोनात नुकसान झालंय. या नुकसानीमुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मंगरूळपीर तालुक्यातील रुई परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. वनोजा परिसरात वादळी वाऱ्यावरसह हलक्या स्वरूपाची गारपीट झाली. यामध्ये वनोजा येथील शेतकरी यांच्या लिंबू फळबागेचे नुकसान झाले.
कलंबा महाली येथील शेतकरी सीताराम महाले याच्या शेतात दोन एकर मिरचीची लागवड केली होती. ऐन तोडणीवर आलेल्या या मिरची पिकाचं काल सायंकाळी झालेल्या गारपिटीने अतोनात नुकसान झालं. उभ्या मिरचीच्या झाडाला पानंसुद्धा गळून पडले आहे. या पिकातून सीताराम महाले याना 50 हजार खर्च वगळता दोन ते अडीच लाख रुपयांच उत्पन्न होणार होतं. मात्र या गारपिटीने नुकसान झालं. आम्हाला पंचनामे करून मदत करा, असे शेतकरी सांगत आहेत.
वादळी वाऱ्यामुळे झाडाचे लिंबू मोठ्या प्रमाणात खाली पडले. तसेच बीजवाई कांद्याचे पीकही खराब होत आहे. काही शेतकऱ्यांचा गहू, हरभरा शेतात उभा असल्यामुळे पाण्याने गहू खराब होत आहे. तसेच शेतकऱ्यांचे वादळी वाऱ्यामुळे सोलर पॅनलही खराब झाले आहे.
सीताराम महाले म्हणाले, माझी दोन एकर मिरची आहे. ही मिरची जवळपास दोन लाख रुपयांची झाली असती. कालच्या गारपिटीने आणि पावसाने नासधूस झाला. सरकारने मदत करावी, अशी अपेक्षा आहे. वर्षभर काय खाणार, अशी समजूत झाली आहे.
दुसरा शेतकरी म्हणाला, आमच्या गावात काल भयानक गारपीट झाली. मिरचीचे डांग गळून पडले. हे झाडं आता परत फूल पकडणार नाही. त्यामुळे शासनाने या नुकसानीचे पंचनामे करावे. शेतकऱ्याला भरपाई द्यावी. ही आमची हात जोडून विनंती आहे.
शेतकरी प्रकाश महाले म्हणाले, कळंबा महाल येथे शेतकऱ्यांचे काल खूप नुकसान झाले. काल गारपिटीचा पाऊस सुरू झाला. निंबाएवढाल्या गारा होत्या. या गारपिटीमुळे मिरचीला पानसुद्धा राहिले नाही. दोन एकर मिरची लावली होती. त्यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. फळबाग, लिंबू, संत्रा, बियाचे कांदे यांचे खूप नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करावे. सरकारने मदत दिली पाहिजे.